लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची आजवर उत्कृष्ट परंपरा राहिली आहे: लोकसभा अध्यक्ष


भारतात निवडणूक प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन हे निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दर्शवते: लोकसभा अध्यक्ष

Posted On: 08 JAN 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025

 

मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची  भारतीय  निवडणूक आयोगाची आजवर उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत  ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली  चैतन्यपूर्ण  लोकशाही आहे यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी  भर दिला. भारतातील निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग अधोरेखित करून त्यांनी नमूद केले की अशा  सहभागातून  आपल्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दिसून येते.

बिर्ला यांनी आज लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष  सर लिंडसे हॉयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त केले. संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे भारत साजरी करत असल्याचे नमूद करून बिर्ला म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष - 2047 पर्यंत भारत एक विकसित देश बनलेला असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारतातील लोकशाही तळागाळापासून संसदेपर्यंत खोलवर रुजलेली आहे याकडे लक्ष वेधून बिर्ला यांनी नमूद केले की, देश धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजातील लिंगाधारित तफावत भरून काढत आहे. संसदीय लोकशाही म्हणून भारताची कामगिरी अधोरेखित करताना  बिर्ला यांनी आवर्जून नमूद केले की विविधता असूनही, संसदीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात भारत  यशस्वी झाला आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संसदीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन करत बिर्ला यांनी दोन्ही देशांदरम्यान संसदीय ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची अधिकाधिक देवाणघेवाण करण्यावर भर दिला. बिर्ला म्हणाले की, दोन्ही देशांच्या युवा आणि महिला संसद सदस्यांनी वारंवार  संवाद साधायला हवा.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाले आहेत आणि याचा दोन्ही देशांतील लोकांना फायदा झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आणि ब्रिटनमधील  ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा संदर्भ देत  बिर्ला यांनी समाधानाने नमूद केले की दोन्ही देश अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091320)