संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवाई दल प्रमुखांची एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 ला भेट

Posted On: 08 JAN 2025 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025

 

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी 8 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कँटोन्मेंट येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 ला भेट दिली. छात्रांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामधून त्यांच्या अंगी शिस्त, निःस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी ची भावना, आदर्श वर्तणुकीचे नियम  यांसारखी मूल्ये रुजवण्यात येतात यावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच छात्रांनी आपल्या आयुष्यात कायमच या मूल्यांची जपणूक करावी असे आवाहनही केले. छात्रांनी एनसीसीच्या 'एकता आणि अनुशासन' या ब्रीदाला कायम जागावे आणि आपण वर्दीत असलो अथवा नसलो तरी, जीवनाच्या सर्व क्षेत्रात या प्रतिज्ञेचे पालन करावे, असाही सल्ला दिला.

एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराच्या माध्यमातून छात्रांना विविध संस्कृतीच्या, धर्माच्या आणि प्रांताच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळते, त्यामुळे त्यांच्यामध्ये देशाची 'विविधतेतील एकता' ही भावना आणखी दृढ होते असेही हवाई दल प्रमुखांनी नमूद केले. या समारंभात उत्कृष्ट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केल्याबद्दल त्यांनी छात्रांचे कौतुक केले.

एनसीसीच्या लष्कर, नौदल आणि हवाईदल या शाखांच्या छात्रांनी दिलेल्या 'गार्ड ऑफ ऑनर'ची हवाई दल प्रमुखांनी पाहणी केली. यानंतर ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलच्या छात्रांनी बँड सादर केला.  सामाजिक जागृतीच्या विविध विषयांवर एनसीसीच्या सर्व 17 संचालनालयातील छात्रांनी मिळून तयार केलेल्या 'ध्वज क्षेत्राची' ही हवाई दल प्रमुखांनी पाहणी केली.

त्यांनी 'हॉल ऑफ फेम' दालनाला देखील भेट दिली, त्यावेळी त्यांना एनसीसी चा इतिहास, प्रशिक्षण आणि कामगिरीची माहिती देण्यात आली. नंतर, हवाई दल प्रमुखांनी इतर मान्यवर पाहुण्यांसमवेत  विविध संचालनालयांच्या छात्रांनी सादर केलेले 'सांस्कृतिक कार्यक्रम' पाहिले. हे कार्यक्रम सादर करून छात्रांनी नृत्यनाट्य, समूह नृत्य आणि गाण्यांद्वारे भारतीय संस्कृतीचे उत्तमरीत्या दर्शन घडविले. 

 

* * *

N.Chitale/M.Ganoo/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091295) Visitor Counter : 21


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil