युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी  पोरबंदरमध्ये 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' मोहिमेचे केले नेतृत्व; ऑलिम्पिकपटू मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, कुस्तीपटू संग्राम सिंग यांनी मोहिमेला दिले पाठिंब्याचे वचन

Posted On: 05 JAN 2025 2:11PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविय यांनी सायकल चालवण्याला प्रोत्साहन म्हणून गुजरातच्या पोरबंदरमधील उपलेटा या त्यांच्या मतदारसंघात, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या, शारीरिक तंदुरुस्तीसाठी रविवारी सायकल स्वारी उपक्रमाचे नेतृत्व केले.  150 हून अधिक सायकलस्वारांनी म्युनिसिपल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ते उपलेटा येथील तालुका स्कूल क्रिकेट मैदानापर्यंत 5 किलोमीटर अंतर, डॉ. मांडविय यांच्या मागून सायकलने कापत पूर्ण केले.

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ च्या या तिसऱ्या आठवड्यात ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन आणि  राष्ट्रकुल स्पर्धेतील अतिवजनी (हेवीवेट) गटातील माजी कुस्ती अजिंक्यवीर संग्राम सिंग यांनी सायकलिंग चळवळीला पाठिंबा देण्याचे वचन दिले.  खरं तर, गेल्या महिन्यात डॉ. मांडविया यांनी उद्घाटन केल्यापासून हा उपक्रम देशभरात 2500 हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

या आठवड्याची संकल्पना, अंमली पदार्थांविरुद्धची सामाजिक मोहीम अशी असून, संग्राम सिंह यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित सायकल फेरीत, भारतीय लष्करातील सैनिक, भारतीय क्रीडा प्राधिकरणतील (SAI) शिबिरार्थी आणि वरिष्ठ अधिकारी, तसेच जायंट सायकल क्लब सारख्या विविध सायकलिंग क्लबचे सायकलपटू यांच्यासह 500 हून अधिक सायकलस्वारांचे नेतृत्व केले. या फेरीतसायकलस्वारांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून कर्तव्यपथ मार्गे विजय चौकापर्यंत आणि माघारी, अशी सायकल वरून रपेट मारली.

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि अर्जुन पुरस्कार विजेती मुष्टीयोद्धी लव्हलिना बोरगोहेन, आसाममध्ये  गुवाहाटी येथील SAI प्रादेशिक केंद्रातून, देशातील विविध भागांतील इतर नामांकित खेळाडूंसह या सायकलिंग  उपक्रमात सामील झाली.

***

S.Kane/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090341) Visitor Counter : 31