उपराष्ट्रपती कार्यालय
पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित
Posted On:
05 JAN 2025 2:28PM by PIB Mumbai
आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प - अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. हे पंच प्रण आपल्याला वैयक्तिक जबाबदारी, पारंपारिक मूल्ये आणि पर्यावरणीय जाणीवांना सांस्कृतिक अभिमान, एकता आणि आत्मनिर्भरतेशी जोडणाऱ्या प्रवासाच्या दिशेने घेऊन जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज दिल्ली कँट इथल्या करिअप्पा संचलन मैदानातील राष्ट्रीय छात्र सेना मुख्य प्रशिक्षण शिबिर महासंचालकांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी (Headquarters Directorate General National Cadet Corps Camp - HQ DG NCC) राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर - 2025 चे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर उपराष्ट्रपतींनी शिबीरासाठी आलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांना संबोधित केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी छात्र सैनिकांना भारताच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी देशविरोधी शक्तींपासून सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले. मातृभूमीप्रती आपले समर्पण अविरत, अविचल आणि अढळ असलायला हवे, कारण तेच आपल्या अस्तित्वाचा आधार आणि भक्कम पाया आहेत असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय छात्र सेना ही मानवी विकासासाठी आवश्यक असणारी सर्व मूल्ये आणि शिस्तबद्ध शाखा आहे अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याची प्रशंसा केली. एक छात्रसैनिक म्हणून राष्ट्रीय छात्र सेना या शिस्तबद्ध शाखेशी जेव्हा तुम्ही जोडले जाता, तेव्हा पासूनच तुम्हाला मानवी विकासासाठी अत्यावश्यक असलेली मूल्ये आत्मसात करण्याची मोठी संधी मिळते, आणि त्याचा तुम्हा प्रत्येकाला मोठा लाभ होतो अशा शब्दांत त्यांनी छात्रसैनिकांना राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्व समजावून सांगितले. राष्ट्रीय छात्र सेना ही संघटना आपल्या छात्र सैनिकांमध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्र - प्रथम हा दृष्टिकोन रुजवते. जोपर्यंत कोणत्याही देशाचे नागरिक स्वतः राष्ट्रवादाप्रती वचनबद्ध होत नाहीत, तोपर्यंत जगातील कोणताही देश स्वतःचा विकास साधू शकत नाहीत असे उपराष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रवादासाठी आपले वैयक्तिक किंवा संघटनात्मक अशा इतर सर्व प्रकारच्या हितसंबंधांचा त्याग करावा लागतो. राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन हाच आपला एकमेव दृष्टिकोन असायला पाहिजे, आपल्या मातृभूमीच्या गौरवासाठी स्वतःमध्ये हा गुण जोपासा असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपस्थित छात्र सैनिकांना दिला.
2047 पर्यंतच्या विकसित भारताच्या वाटचालीच्या काळात राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक हे भारताच्या गौरवाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातील, तुमची पिढीच वैभवशाली भारताची जडणघडण करेल अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी छात्रसैनिकांचा गौरव केला. आज आपण अशा कालखंडात जगत आहोत, ज्या काळात आपला राष्ट्रीय आशावाद अत्यंत प्रबळ आहे आणि आपला भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे त्यांनी सांगितले. जगभरातील संस्था गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून भारताचा गौरव करत आहेत, आणि आज देशात युवा वर्गासाठीच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यावेळी म्हणाले.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090337)
Visitor Counter : 41