रेल्वे मंत्रालय
29 क्रीडा प्रकारांमधील 9,000 हून अधिक खेळाडूंना व्यापक सहाय्य पुरवत भारतीय रेल्वेद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेला आकार देण्याबरोबरच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्टतेला चालना
Posted On:
02 JAN 2025 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025
भारतीय रेल्वे आपल्या रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळ (आरएसपीबी) या क्रीडा शाखेच्या माध्यमातून 1928 पासून देशभरात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे योगदान देत आहे. सुरुवातीच्या काळात हॉकी, ऍथलेटिक्स आणि टेनिसला प्रोत्साहन देणारे हे मंडळ देशात खेळांच्या प्रचारासाठी एक महत्त्वाची संस्था बनली आहे आणि सध्या 29 क्रीडा प्रकार - 18 वैयक्तिक खेळ आणि 11 सांघिक खेळांमध्ये सक्रिय आहे. हे मंडळ 28 राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी संलग्न आहे तसेच युएसआयसी (वर्ल्ड रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन) शी देखील संलग्न आहे.
भारतीय रेल्वेने नोकऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षा सुनिश्चित करून अनेक खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. आजपर्यंत, 29 क्रीडा प्रकारांमध्ये 9000 हून अधिक खेळाडू भारतीय रेल्वेच्या सेवेत आहेत ज्यापैकी सुमारे 3000 सक्रिय खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भारतीय रेल्वेच्या खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने वर्ष 2024 साठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या 32 खेळाडूंपैकी पाच खेळाडू भारतीय रेल्वेचे आहेत ही अभिमानाची बाब आहे. खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा प्रकारांचा तपशील खालीलप्रमाणे:
1. ज्योती याराजी, एससीआर (ॲथलेटिक्स-100 मीटर अडथळा)
2. अन्नू राणी,पीएलडब्ल्यू (ॲथलेटिक्स-भालाफेक)
3. सलीमा टेटे, एसईआर (हॉकी)
4. स्वप्नील सुरेश कुसाळे, सीआर (नेमबाजी -50 मीटर 3P)
5. अमन, एनआर (कुस्ती-57 किलो फ्रीस्टाइल)
या 5 अर्जुन पुरस्कारांसह, एकूण 183 अर्जुन, 28 पद्मश्री, 12 ध्यानचंद, 13 द्रोणाचार्य आणि 9 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भारतीय रेल्वेच्या शिरपेचात असून भारतातील कोणत्याही एका संस्थेसाठी अशा पुरस्कार विजेत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.
लखलखती कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंचे भारतीय रेल्वे अभिनंदन करत आहे आणि पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी शुभेच्छा देत आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2089692)