संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे तुशिल हे जहाज मोरोक्को मधल्या कासाब्लांका येथे दाखल
Posted On:
28 DEC 2024 2:00PM by PIB Mumbai
भारत आणि मोरोक्को यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि नौदल सहकार्य मजबूत करण्याचा एक भाग म्हणून, आयएनएस तुशील 27 डिसेंबर 24 रोजी कासाब्लांका, मोरोक्को येथे दाखल झाले. मोरोक्को हे एक सागरी राष्ट्र आहे आणि भारताप्रमाणेच भूमध्य आणि अटलांटिक महासागर या दोन्ही किनारपट्टीसह एक अद्वितीय भौगोलिक स्थान आहे.
भारतीय युद्धनौकेची भेट ही दोन्ही नौदलांमधील सहकार्यासाठी आणखी संधी शोधण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. गेल्या 12 महिन्यांत, भारतीय नौदलाच्या तीन जहाजांनी - तबर, तरकश आणि सुमेधा यांनी कासाब्लांकाला भेट दिली, ज्यामुळे परस्पर विश्वास आणि आंतरसंचालन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे, हे उल्लेखनीय.
या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान, तुशीलचा चमु रॉयल मोरक्कन नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत कार्यात्मक स्तरावर चर्चा करेल. तसेच नौदल सहकार्य, राजनैतिक सहकार्य आणि सद्भावना वाढविण्यासाठी प्रतिष्ठित वरिष्ठ अधिकारी आणि इतर पाहुण्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर, दोन्ही नौदल आंतरसंचालन सुधारण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी समुद्रात पासेक्स सरावात (PASSEX) सहभागी होतील.
आयएनएस तुशील 09 डिसेंबर 24 रोजी रशियामध्ये कार्यान्वित करण्यात आली होती आणि कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखाली 250 कर्मचाऱ्यांचा समर्पित चमु यात कार्यरत आहे. कारवारमधील आपल्या गृह बंदराच्या दिशेने प्रवास जारी राखत ही नौका या दरम्यान मैत्रीपूर्ण परदेशी नौदलांसोबत सहयोगी सरावांमध्ये भाग घेईल आणि या क्षेत्रातील राष्ट्रांसोबत भारताच्या सागरी मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देईल.
***
N.Chitale/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2088590)
Visitor Counter : 39