सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची आढावा बैठक


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बीबीएसएसएलसाठी वर्ष 2025-26 पर्यंत आणखी 20,000 सहकारी संस्थांशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले

बीबीएसएसएलने कमी पाणी आणि कमी कीटकनाशके लागणाऱ्या बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, यावर अमित शाह यांनी दिला भर

Posted On: 26 DEC 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे  भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची आढावा बैठक झाली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण  पाल आणि मुरलीधर मोहोळ या बैठकीला उपस्थित होते. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या बैठकीला संबोधित केले. 'सहकारातून समृद्धी' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यात आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची (बीबीएसएसएल) महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.  बीबीएसएसएलने भारताच्या पारंपरिक बियाणांचे संवर्धन आणि संकलन केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत अमित शाह यांनी  बीबीएसएसएलसाठी वर्ष  2025-26 पर्यंत आणखी 20,000  सहकारी संस्थांशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले. बीबीएसएसएलने कमी पाणी आणि कमी कीटकनाशके लागणाऱ्या बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, यावर अमित शाह यांनी भर दिला. लहान शेतकऱ्यांचे उत्पादन जास्तीत जास्त वाढावे आणि त्यांच्या पिकांचा परिपक्वता कालावधी वाढावा यासाठी प्रयत्न करायला हवे, यावर  शाह यांनी भर दिला. 

बीबीएसएसएलचे प्राधान्य आता कमी वापरात असलेल्या पारंपरिक पोषक बियाणांचे संवर्धन आणि चालना देण्याचे असायला हवे. तसेच पौष्टिक मूल्य कमी न होता कडधान्य आणि तेलबियांचे उत्पादन वाढायला हवे, असे शाह यांनी सांगितले. सर्व सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणांसह शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी नमूद केले. देशभरातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 20,000 हून अधिक विविध सहकारी संस्था बीबीएसएसएलच्या  भागधारक असल्याचे शाह यांनी अधोरेखित केले. 

रबी 2024 मध्ये, बीबीएसएसएल  6 राज्यांमध्ये 5,596 हेक्टर क्षेत्रावर पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करत आहे. या कार्यक्रमांतर्गत, 8 पिकांच्या 49 जातींमधून अंदाजे 1,64,804 क्विंटल बियाण्यांचे उत्पादन अपेक्षित आहे. बीबीएसएसएलने वर्ष  2032-33 पर्यंत एकूण 18,000 कोटी रुपये उलाढाल साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.  बीबीएसएसएलने सुरुवात झाल्यापासून  41,773 क्विंटल बियाणे विक्री /वितरीत केले आहे. यात  प्रामुख्याने गहू, भुईमूग, ओट्स आणि बरसीम या चार पिकांचा समावेश असून त्याचे  बाजार मूल्य अंदाजे 41.50 कोटी रुपये आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2088252) Visitor Counter : 51