आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिवताप निर्मूलनातील भारताच्या प्रगतीबद्दल अद्ययावत माहिती

Posted On: 25 DEC 2024 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024

 

हिवतापमुक्त भविष्याकडे भारताचा प्रवास ही उल्लेखनीय परिवर्तन आणि प्रगतीची कथा आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी हिवताप हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक होते, ज्याचे दरवर्षी अंदाजे 7.5 कोटी रुग्ण तर 800,000 मृत्यू होते. अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे या संख्येत 97% पेक्षा जास्त घट झाली असून 2023 पर्यंत हिवताप रुग्णांची संख्या फक्त 20 लाख तर मृत्यू फक्त 83, इतकी घसरली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी, हिवतापाचे उच्चाटन आणि नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करते.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या जागतिक हिवताप अहवाल 2024 मध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा गौरव करण्यात आला आहे. भारताच्या यशामध्ये 2017 आणि 2023 दरम्यान हिवताप रुग्ण प्रकरणे आणि हिवतापाशी संबंधित मृत्यूंमध्ये लक्षणीय घट समाविष्ट आहे. 2024 साली भारताचे जागतिक आरोग्य संघटनेच्या हाय बर्डन टू हाय इम्पॅक्ट (एचबीएचआय) गटातून बाहेर पडण्याने हे यश अधोरेखित झाले आहे, जो हिवताप विरोधातील लढ्याला कलाटणी देणारा एक क्षण बनला आहे. देशाच्या मजबूत सार्वजनिक आरोग्य उपाय आणि 2030 पर्यंत हिवताप मुक्त दर्जा प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून हे यश उल्लेखनीय आहे.

भारतातील साथरोगाच्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्यांनी केलेले प्रयत्नही अधोरेखित झाले आहेत. 2015 ते 2023 पर्यंत अनेक राज्ये उच्च रुग्ण संख्या श्रेणीतून लक्षणीयरीत्या कमी किंवा शून्य रुग्ण श्रेणीत बदलली आहेत.

2015-2023 या काळात हिवतापाचे रुग्ण आणि हिवतापामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये सुमारे 80% घट झाली आहे, 2015 मध्ये असलेली हिवतापाच्या रुग्णांची संख्या 11,69,261 वरून घटून 2023 मध्ये 2,27,564 वर आली आहे, तर मृत्यूची संख्या 384 वरून 83 वर आली आहेत. ही विस्मयकारक घट हिवतापाचा सामना करण्यासाठी झालेले अथक प्रयत्न दर्शवते.

भारताच्या या यशाचा पाया त्याच्या सर्वसमावेशक आणि बहुआयामी धोरणात आहे. हिवताप निर्मूलनासाठी राष्ट्रीय आराखडा (NFME), 2016 मध्ये सुरू करण्यात आला. यात  2027 पर्यंत शून्य हिवताप रुग्ण स्थिती साध्य करण्यासाठी एक स्पष्ट मार्गदर्शक आराखडा प्रदान करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे, हिवताप निर्मूलनाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेने (2023-2027) कठोर देखरेख आणि तत्पर रुग्ण व्यवस्थापन सुरू केले. यासाठी "चाचणी, उपचार आणि ट्रॅकिंग" दृष्टिकोनाद्वारे व्यवस्थापन, आणि इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म (IHIP) द्वारे रिअल-टाइम डेटा ट्रॅकिंगचा विकास केला जात आहे. 

भारताच्या हिवताप निर्मूलनाच्या प्रवासात सामुदायिक एकीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  आयुष्मान भारत आरोग्य पॅकेजमध्ये हिवताप प्रतिबंध आणि उपचार सेवांचा समावेश केल्याने सर्वात असुरक्षित लोकांना देखील अत्यावश्यक आरोग्य सेवेची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे.

क्षमता निर्माण आणि संशोधनासाठी भारताची वचनबद्धता देखील या यशात महत्वाची आहे.  भारताच्या प्रगतीत सहकार्य आणि निधी यंत्रणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या पुढे जाऊन, 2030 सालापर्यंत हिवतापाचे उच्चाटन करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर भारत ठाम आहे.  2027 सालापर्यंत हिवतापाचे शून्य रुग्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि हिवतापाच्या पुन्हा होणाऱ्या उद्रेकाचा प्रतिबंध सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.  धोरणात्मक आराखडा, मजबूत उपाय आणि सामुदायिक सहभाग यांचा मेळ घालून भारत हिवताप निर्मूलनात जागतिक मापदंड प्रस्थापित करत आहे आणि सार्वजनिक आरोग्य उत्कृष्टतेसाठी आपल्या वचनबद्धतेची खातरजमा करत आहे.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2087953) Visitor Counter : 24


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil