ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ग्राहक हक्क रक्षणासाठीच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आरंभ
'जागो ग्राहक जागो ॲप','जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड', 'ई-मॅप' पोर्टल, AI आधारित NCH 2.0 चा प्रारंभ तसेच SMART मानकेही सादर
जोशी यांच्या हस्ते गुवाहाटी येथील राष्ट्रीय चाचणी केंद्रातील 'सेंद्रीय अन्न चाचणी प्रयोगशाळा'आणि मुंबईच्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातील,'लो व्होल्टेज स्विच गिअर चाचणी सुविधे'चेही उद्घाटन
Posted On:
24 DEC 2024 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 निमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ग्राहक हिताच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.
ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात ग्राहकांचे संरक्षण आणि सक्षमीकरण यामध्ये विभागाने केलेली लक्षणीय प्रगती ठळकपणे दाखवून देण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. "दूरस्थ पद्धतीने सुनावणी आणि ग्राहकांना न्यायासाठी डिजिटल प्रणालीची सुविधा" असा या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा मुख्य विषय असून त्यामधून नाविन्यपूर्ण उपाय आणि पारदर्शक निवारण प्रणालींद्वारे ग्राहकांचे हित जास्तीत जास्त जपण्याबद्दलची वचनबद्धता प्रतिबिंबित होते.
प्रल्हाद जोशी उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, तक्रारींची दूरस्थ पद्धतीने सुनावणी केल्याने ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी डिजिटल प्रणालीच्या वापराची मुभा उपलब्ध होऊ शकते, ही गोष्ट ग्राहकांना तत्परतेने आणि सहजपणे न्याय मिळेल हे सुनिश्चित करण्याबद्लची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता दर्शवते. सीसीपीएने अलीकडच्या काही वर्षांमध्ये ग्राहकांच्या हिताच्या रक्षणात साध्य केलेले मोठे यश त्यांनी अधोरेखित केले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 10,300 हून अधिक मानक क्लब स्थापन करून गुणवत्ता कनेक्शन अभियानासारख्या जागृती कार्यक्रमाचे कौतुक करून मंत्री महोदयांनी ग्राहक जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून आपण ग्राहकांच्या सक्षमीकरणाचा अधिक चांगला पाया रचत आहोत, असे ते म्हणाले. सर्वांनी ग्राहकांची काळजी घेण्याच्या दिशेने काम करताना ग्राहक, विक्रेता आणि उत्पादक यांच्यात समतोल राखल्यास फायद्याची बाजारपेठ टिकून राहू शकते, असेही ते पुढे म्हणाले
यावेळी प्रल्हाद जोशी यांनी डार्क पॅटर्नपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा आरंभ केला. या ॲप्लिकेशन्समुळे ग्राहक व्यवहार विभागाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील डार्क पॅटर्न शोधून काढण्यासाठी साधने आणि संसाधनांसह मदत होणार असून या साधनांमुळे ग्राहक लवकरच सक्षम बनतील. प्रशासन आणि परिचालनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वात वाढ करणाऱ्या नॅशनल लीगल मेट्रोलॉजी ई-मॅप चा देखील त्यांनी प्रारंभ केला
विभागाने आपल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन पोर्टलची फेररचना केली असून त्यामध्ये आधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट करून त्याद्वारे अधिक कार्यक्षम, वर्धित नेव्हिगेशन तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 च्या निमित्ताने माननीय मंत्र्यांनी सुरू केलेल्या कृत्रिम बुध्दिमत्ता आधारित NCH 2.0 द्वारे अधिक जलदपणे तक्रार निवारण केले जाईल. NCH 2.0 मध्ये विविध भाषांमधून मदतीची सोय आहे तसेच कृत्रिम बुध्दिमत्तेवर चालणारे चॅटबॉट्स देखील आहेत, त्यामुळे देशभरातील ग्राहकांना सुरळित आणि समावेशक सोय उपलब्ध होणार आहे .
अन्न सुरक्षा आणि विद्युत गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी गुवाहाटी येथील राष्ट्रीय चाचणी केंद्रात सुरू केलेल्या 'सेंद्रीय अन्न चाचणी प्रयोगशाळेचे' आणि मुंबईतील राष्ट्रीय चाचणी केंद्रातील 'लो व्होल्टेज स्विच गियर टेस्टिंग फॅसिलिटी'चे उद्घाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी पॅकबंद वस्तूंबाबतच्या नियमांसंबंधीचे अद्ययावत ई-पुस्तकही जारी केले, जेणेकरून ग्राहकांना समजण्यासाठी आणि अनुपालनासाठीची सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध होतील
सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री, बी.एल. वर्मा यावेळी बोलताना म्हणाले की ग्राहक व्यवहार विभागाचा केवळ ग्राहकांच्या हिताच्या रक्षणावरच नव्हे तर त्यांच्या प्रगतीवरही भर असून त्या अनुषंगाने हा विभाग कार्य करत आहे.ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी ई-जागृती पोर्टल आणि NCH 2.0 17 भाषांमध्ये 24*7 उपलब्ध आहेत
संपूर्ण कार्यक्रम पुढे दिलेल्या लिंकवर पाहता येईल:
https://www.youtube.com/live/Nt-Q5orPBd4
N.Chitale/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087707)
Visitor Counter : 26