गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सुरक्षा यंत्रणांनी देशातील विविध आव्हानांविरोधात निर्णायक लढा देवून मिळवले वर्चस्व -केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा


महत्वाच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले, सायबर हल्ले, माहिती युद्ध, रासायनिक युद्ध यासारख्या आव्हानांना तोंड देताना, उपाय शोधण्यासाठी आपल्याला "चौकटीच्या बाहेर" विचार करण्‍याची गरज

Posted On: 23 DEC 2024 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024


केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांचे आज नवी दिल्ली येथे ‘37 व्या इंटेलिजन्स ब्युरो सेंटेनरी एंडॉवमेंट लेक्चर’ सत्रामध्‍ये व्याख्‍यान झाले.

आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सुरक्षा यंत्रणांनी गेल्या 5 वर्षांत निर्णायक लढा  देत  देशाला असलेल्या विविध धोक्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

यावेळी अमित शाह म्हणाले की, गुप्तचर संस्थांची कार्यपद्धती, त्यांची दक्षता, सक्रियता, निर्णायक भूमिका आणि त्याग आणि समर्पणाची परंपरा आहे, त्यामुळे आज देश सुरक्षित आहे. ते  पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आधुनिक आव्हाने आणि कठीण परिस्थितीला तोंड देत गुप्‍तचर संस्‍थांनी देशाला सुरक्षित ठेवले आहे.

यावेळी अमित शहा म्हणाले की, आजच्या युगात सार्वभौमत्वाची व्याप्ती आता केवळ प्रादेशिक सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सार्वभौमत्वाच्या व्याख्येत आपण नावीन्य, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संसाधने,  संशोधन आणि विकास प्रक्रियांचा समावेश केला नाही तर आपण देशाची सुरक्षितता सुनिश्चित करू शकणार नाही, यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर त्यांनी  इशारा दिला की, या क्षेत्रांना सुरक्षित करण्यात लहानशी चूकही आमच्या सार्वभौमत्वाला हानी पोहोचवू शकते आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

कृत्रिम प्रज्ञा (एआय), मशीन लर्निंग (एमएल ) आणि सायबरस्पेस यांसारख्या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांबाबत आपण आपली दक्षता वाढवली पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. भौतिक नुकसान करणाऱ्या देशद्रोही घटकांपासून केवळ सावध राहणे पुरेसे नाही,  यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, जसजशी आपण प्रगती करतो तसतशी स्पर्धा तीव्र होते, धोके वाढतात आणि अडथळा निर्माण करणाऱ्या शक्तींचा उदय होतो. या धोक्यांना तोंड देण्यासाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करणे, मुख्यालयापासून ते पोलिस स्‍थानके आणि कॉन्स्टेबलपर्यंत,एकात्मिक भावनेने, एकाच उद्देशाने कार्यरत राहणे गरजेचे आहे, ही  तरुण अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे यावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, प्रादेशिक नेता  असलेला भारत गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता जागतिक नेता बनला आहे.

अमित शहा म्हणाले की, देशात आजही फुटीरतावादी शक्ती सक्रिय आहेत. अयोग्य  माहिती, चुकीची माहिती, गैर- माहिती आणि खोट्या बातम्यांमध्ये इतके सामर्थ्य आहे की नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या समाजाच्या सामाजिक जडणघडणीला विस्कळीत करण्यासाठी ते नेहमीच सिध्‍द असते, यावर त्यांनी भर दिला.

महत्वाच्या  पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले, सायबर हल्ले, माहिती युद्ध, मनोवैज्ञानिक युद्ध, रासायनिक युद्ध आणि तरुणांचे कट्टरपंथीकरण ही आपल्यासमोरील गंभीर आव्हाने असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले. देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी आजवर ज्याप्रमाणे सर्व आव्हानांचा सामना केला आहे, त्याच तत्परतेने आणि सतर्कतेने या धोक्यांचा सामना  आताही करू शकतील, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी  व्यक्त केला.


 
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2087455) Visitor Counter : 29