गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताकडे लवकरच जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असेल : मनोहर लाल खट्टर


गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन

Posted On: 19 DEC 2024 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024


केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल यांनी वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरी वाहतूकव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर भर दिला आणि देशभरातील शहरी वाहतूक जाळे बळकट करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

देशभरात 23 शहरांमध्ये सुमारे 993 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे कार्यरत असून 28 शहरांमध्ये 997 किलोमीटर लांबीच्या मेट्रो जाळ्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असलेला देश बनण्याकडे भारताची वाटचाल योग्य रितीने सुरू आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

शहरी वाहतूक हा या बैठकीच्या कार्यक्रम सूचीचा विषय होता.

यावेळी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने या बैठकीत सदस्यांसमोर विषयानुरूप सादरीकरण केले.

यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना मेट्रो रेल्वे धोरण 2017 आणि दिल्ली मेट्रो, जयपूर मेट्रो, पाटणा मेट्रो आणि लखनौ मेट्रोसहित शहरांमधील मेट्रो जाळ्यांची माहिती देण्यात आली.    

या सदस्यांना सध्या सुरू असलेल्या आरआरटीएस जाळ्यांची देखील  त्यांना होत असलेल्या अर्थसाहाय्यासहित माहिती देण्यात आली.या माहितीमध्ये मेक इन इंडिया अंतर्गत तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाला आणि आत्मनिर्भर भारतला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचा देखील समावेश होता.

पीएम-ईबस सेवा या शहरातील बस सेवेला बळकटी देणाऱ्या सेवेची देखील यावेळी माहिती देण्यात आली. या सेवेअंतर्गत  सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या(पीपीपी) माध्यमातून 10,000 ई-बस सेवा तैनात करण्यात येणार आहेत. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

  • पीपीपी मॉडेलनुसार 10,000 ई-बसेस तैनात करणार
  • 10 वर्षांसाठी बस परिचालन पाठबळ
  • बस आगारांचा विकास/अद्ययावतीकरणाला पाठबळ
  • बिहाईन्ड द मीटर ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी पाठबळ
  • तीन ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना सेवेचा लाभ देणे  

या माहिती अंतर्गत वन नेशन वन कार्ड या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च,2019 रोजी मेट्रो, रेल्वे, बस आणि इतर सार्वजनिक परिवहन सेवांमधून विनाखंड प्रवास करता यावा यासाठी सुरू केलेल्या आणि संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या राष्ट्रीय सामाईक परिवहन कार्डाच्या माहितीचा देखील समावेश होता.

या बैठकीत खासदारांनी शहरी परिवहनामधील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासंदर्भातील समस्या, सुविधांमध्ये वाढ करणे, आपापल्या मतदारसंघांमध्ये/ राज्यांमध्ये मेट्रो संपर्कव्यवस्था, देशात मेट्रो परिचालनात वाढ करणे, प्रवास सुलभता आणि प्रवाशांचा आरामदायी अनुभव याविषयीचे मुद्दे उपस्थित केले.

केंद्रीय मंत्र्यांनी या सदस्यांकडून प्राप्त झालेल्या सूचना आणि अभिप्रायांचा आढावा घेण्याच्या आणि त्या संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांना माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.          
                   

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2086159) Visitor Counter : 14


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil