गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधील जगदलपूर येथे शस्त्रे सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या छत्तीसगड, महाराष्ट्र, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आसाममधील लोकांची घेतली भेट.

Posted On: 15 DEC 2024 8:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधील जगदलपूर येथे शस्त्रे सोडून  समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेल्या छत्तीसगड, महाराष्ट्र, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आसाममधील लोकांची भेट घेतली. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय  आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

072A1850 (1).JPG

नक्षलग्रस्त भागातील अनेक तरुण मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत आणि आता भारत सरकार असे  तरुण तसेच नक्षलवादाच्या प्रभावाने त्रस्त लोकांच्या कल्याणासाठी एक व्यापक योजना तयार करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलग्रस्त भागात 15,000 घरे बांधण्यास मंजुरी दिली असल्याचा खुलासा शहा यांनी केला. याशिवाय, सरकार या भागातील प्रत्येक कुटुंबाला एक गाय किंवा म्हैस देऊन दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्याची योजना सुरू करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

072A1682 (1).JPG

हिंसा हा उपाय नाही तसेच ज्यांनी शस्त्रे उचलली आहेत त्यांना समाजात पुन्हा आणले  पाहिजे यावर त्यांनी भर दिला.  छत्तीसगड सरकारचे  आत्मसमर्पण धोरण सर्वोत्कृष्ट धोरण असल्याचे सांगून त्यांनी या धोरणाची प्रशंसा केली. ज्या तरुणांनी शस्त्रांचा त्याग केला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या धोरणाची देशभरात पुनरावृत्ती करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

072A1872 (1).JPG

072A1853 (1).JPG

ज्यांनी शस्त्रे टाकली आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले त्यांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला आहे आणि या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.  या तरुणांचे उदाहरण समोर ठेवून आणखी अनेक तरुण शस्त्रे सोडून शांतता आणि विकासाचा मार्ग निवडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084664) Visitor Counter : 31