नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 आणि 16 वर अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 'जलवाहक' योजनेचा केला प्रारंभ

Posted On: 15 DEC 2024 1:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग  मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी 'जलवाहक' या प्रमुख योजनेचा  आज नवी दिल्लीत प्रारंभ केला. . यामुळे - राष्ट्रीय जलमार्ग 1 (गंगा नदी) तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (बराक नदी) द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज, जीआर जेट्टीवरून एमव्ही एएआय, एमव्ही होमी भाभा आणि एमव्ही त्रिशूलसह अजय आणि दीखू या दोन डंब बार्जेससह इतर मालवाहू जहाजांना हिरवा झेंडा दाखवला. आजच्या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय जलमार्ग (एनडब्ल्यू ) 1 आणि 2 साठी हल्दिया येथून मालवाहू जहाजांच्या निश्चित  सेवेची सुरुवात झाली . निश्चित करण्यात आलेल्या दिवशी निर्धारित नौकानयन सेवा राष्ट्रीय जलमार्ग 1 च्या कोलकाता - पाटणा - वाराणसी - पाटणा - कोलकाता या टप्प्यात आणि राष्ट्रीय जलमार्ग 2 च्या गुवाहाटीमधील कोलकाता आणि पांडू दरम्यान इंडो बांगलादेश प्रोटोकॉल मार्गानुसार वाहतूक सेवा प्रदान करेल.

यावेळी बोलताना सोनोवाल म्हणाले , “पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली सरकारने अंतर्देशीय जलमार्गांच्या आपल्या समृद्ध जाळ्याच्या प्रचंड क्षमता साकारण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत.  किफायतशीर, पर्यावरणीयदृष्ट्या सुदृढ आणि कार्यक्षम वाहतुकीच्या साधनाच्या फायद्यासह जलमार्गाद्वारे मालवाहतूक वाढवण्याची सरकारची इच्छा असून यामुळे रेल्वे आणि रस्त्यांवरील  गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

जलवाहक योजना एनडब्ल्यू 1, एनडब्ल्यू 2 आणि एनडब्ल्यू 16 वर लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन देते आणि व्यापार हितांसाठी जलमार्गांद्वारे मालवाहतुकीच्या संधी शोधण्याचा एक उत्तम आर्थिक प्रस्ताव प्रदान  करते. तसेच कोलकाता येथून सुरू झालेली नियमित निर्धारित  मालवाहतूक सेवा  मालाची वाहतूक आणि वितरण  वेळेत होईल याची काळजी घेईल. ”

कार्गो  प्रोत्साहन योजना कार्गो  मालकांना 300 किमी पेक्षा अधिक अंतरासाठी अंतर्देशीय जलमार्गांद्वारे त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी थेट प्रोत्साहन देते. देशातील जलमार्ग विकासाची नोडल  एजन्सी असलेल्या इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (आयडब्ल्यूएआय) तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ची  पूर्ण मालकी असलेल्या इनलँड अँड कोस्टल शिपिंग लिमिटेड (आयसीएसएल) या उपकंपनीचा हा संयुक्त प्रयत्न आहे. ‘जलवाहक’ योजना  इंडो बांगलादेश प्रोटोकॉल च्या माध्यमातून एनडब्ल्यू 1 (गंगा नदी), एनडब्ल्यू 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि एनडब्ल्यू 16 (बराक नदी) वरून जलमार्गाने मालवाहतूक करताना झालेल्या एकूण परिचालन खर्चाच्या 35% पर्यंत परतफेड देते. ही योजना सुरुवातीला 3 वर्षांसाठी वैध असेल.

निश्चित दिनाची निर्धारित नौवहन सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट जलमार्गांना मालवाहू वाहतुकीसाठी एक व्यवहार्य, आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार पर्याय म्हणून प्रदर्शित  करणे हे आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084597) Visitor Counter : 47