संरक्षण मंत्रालय
सागरी क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करणे : नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी इंडोनेशियाच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना
Posted On:
14 DEC 2024 3:05PM by PIB Mumbai
नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी 15 ते 18 डिसेंबर 24 या कालावधीत इंडोनेशियाच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून याद्वारे धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करून नौदलातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
या दौऱ्यात नौदलप्रमुख, इंडोनेशियाच्या सरकारमधील उच्चपदस्थांशी आणि संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत, यामध्ये इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल स्जाफ्री स्जामसोएद्दीन (निवृत्त), इंडोनेशियन सशस्त्र दलाचे कमांडर जनरल अगुस सुबियांटो आणि इंडोनेशियाच्या नौदलाचे प्रमुख ॲडमिरल मुहम्मद अली यांचा समावेश आहे.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्याच्या सर्व पैलूंचा या चर्चेत सांगोपांग विचार केला जाणार आहे, यामध्ये प्रामुख्याने सागरी सुरक्षा, संयुक्त प्रशिक्षण उपक्रम आणि दोन्ही देशांच्या नौदलात परिचालन सहयोग वाढवण्यासाठी करायचे प्रयत्न यांचा समावेश आहे.
हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सागरी सहकार्याला प्राधान्य देऊन दोन्ही देशांमधील सागरी संबंधांना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्वपूर्ण आहे.
सध्या, आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर 43 वी भारत-इंडोनेशिया समन्वित गस्त (10-18 डिसेंबर दरम्यान) सुरू आहे.
ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांचा इंडोनेशिया दौरा दोन्ही देशांच्या नौदलामधील मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्य अधिक बळकट करेल आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे.
***
S.Kane/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084457)
Visitor Counter : 41