सांस्कृतिक मंत्रालय
प्रयागराज: परंपरा आणि आधुनिकतेचा संगम
2025 मध्ये होणारा महा कुंभमेळा: आध्यात्मिक सोहळ्यांचे नवीन जागतिक मापदंड स्थापित करणार
Posted On:
12 DEC 2024 5:04PM by PIB Mumbai
कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा शांततापूर्ण धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो. या मेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी एकत्र येत असतात. हे पवित्र स्नान म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नवचैतन्याचे प्रतिक मानले जाते. 12 वर्षांतून चार वेळा गंगा नदीच्या तिरावर हरिद्वार इथे, उज्जैन मध्ये शिप्रा नदीच्या तिरावर, नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तिरावर आणि प्रयागराजमध्ये जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम होतो, अशा चार ठिकाणी आलटून पालटून आयोजित केला जातो.
प्रयागराजमध्ये आयोजित होणाऱ्या महा कुंभमेळा 2025 मागचा इतिहास
कुंभमेळा हा केवळ आध्यात्मिक कार्यक्रम नाही, तर हा मेळा म्हणजे संस्कृती, परंपरा आणि भाषांचा अनोखा संगम आहे. हा मेळा म्हणजे कोणत्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय येथे कोट्यवधी लोक एकत्र येण्याच्या अर्थात छोट्या स्वरुपातील संपूर्ण भारताचेचे दर्शन घडवून आणणारा सोहळा आहे. या मेळ्याच्या निमित्ताने साधू, संन्यासी, कल्पवासी, आणि विविध पार्श्वभूमीचे साधक एकत्र येऊन भक्ती, संयम, आणि एकतेचे दर्शन घडवतात. 2017मध्ये युनेस्कोने कुंभ मेळ्याला 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' म्हणून मान्यता दिली. खरे तर, कुंभमेळ्याला विलक्षण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची पार्श्वभूमी लाभली आहे. 2025मध्ये प्रयागराज येथे हा भव्य सोहळा पुन्हा आयोजित केला जाणार आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधित हा मेळावा आयोजित केला जाईल. या मेळाव्याच्या निमित्ताने अवघ्या विश्वाला पारंपरिक विधी, संस्कृती, आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम अनुभवता येईल.
महाकुंभ मेळा 2025: आध्यात्मिकता आणि नवोन्मेषाच्या नव्या युगाची नांदी
2025मध्ये प्रयागराज इथे आयोजित होणार महाकुंभ मेळा हा आध्यात्मिकता, संस्कृती आणि इतिहासाचा अनोख्या संगमाची अनुभुती देणारा असेल. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित होणाऱ्या या मेळ्यात, भाविकांना आध्यात्मिक विधींमध्ये तर सहभागी होता येईलच, त्यासोबतच त्यांना शारीरिक, सांस्कृतिक, आणि आध्यात्मिक सीमा ओलांडून एका अद्वितीय प्रवासाचा अनुभवही घेता येणार आहे. प्रयागराज शहरातील गजबजलेल्या रस्ते, इथल्या गजबजलेल्या बाजारपेठा आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीपर्यंत इथली प्रत्येक गोष्ट या अनुभवाला एक नवाच आयाम मिळवून देणारी ठरणार आहे. या मेळाव्यातील आखाड्यांची शिबीरांनीही या मेळाव्याला नवा आयाम मिळणार आहे. या आखाड्यांमध्ये साधू–संन्यासींमधील अध्यात्मिक चर्चासत्रांपासून ते ध्यानधारणेपर्यंत, ज्ञानादानासारख्या उपक्रम आणि कार्यक्रमांमुळे या महाकुंभ मेळ्याला एक नवीन आध्यात्मिक आयाम प्राप्त होणार आहे. या सर्व गोष्टींमुळेच प्रयागराज येथे आयोजित होणारा महा कुंभमेळा 2025 हा विश्वास, संस्कृती, आणि इतिहासाचा एक अद्भुत सोहळा ठरेल, जो या मेळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आयुष्य समृद्ध करणारा अनुभव देणारा असणार आहे.
2025 मधील प्रयागराज येथे आयोजित होणारा महा कुंभमेळा हा अत्याधुनिक पायाभूत सेवा सुविधा आणि आवश्यक सेवांनी सुसज्ज असणार आहे. यामुळे भाविकांना या मेळाव्यातील आपला वावर अधिक सुलभ, सुरक्षित आणि संस्मरणीय झाल्याचाच अनुभव देणारा ठरेल. यादृष्टीने सुधारित स्वच्छता प्रणाली, विस्तारित वाहतूक व्यवस्था, आणि उन्नत सुरक्षा उपायांमुळे हा अनुभव अधिक सुलभ, सुरक्षित आणि समृद्धतेचा असणार आहे. 2025 मधील महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी नवोन्मेषाधारीत उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे, यामुळे एका अर्थाने हा मेळा अशा प्रकारच्या भव्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांच्या आयोजनांचे जागतिक मापदंड पुन्हा नव्याने परिभाषित करणारा ठरणार आहे.
प्रयागराज : इतिहासाचा प्रवास उलगडताना
प्रयागराज या शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शहराचा इतिहास सुमारे इ.स.पू. 600 मध्ये वत्स साम्राज्याच्या कालखंडापर्यंत विस्तारलेला आहे. त्यावेळी कौशंबी ही या प्रदेशाची राजधानी होती. गौतम बुद्धांनी देखील कौशंबीत भेट दिली होती. त्यानंतर, सम्राट अशोकाने मौर्य साम्राज्यातील एक प्रांतीय केंद्र म्हणून या शहराची स्थापना केली. या ठिकाणी त्याचे स्तंभ देखील आपल्याला आजही पाहायला मिळतात. शुंग, कुषाण, आणि गुप्त या राजवंशांनी देखील या प्रदेशात आपल्या कलाकृती आणि शिलालेख स्थापित केल्याचेही आपल्या दिसते.
सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्युएन त्सांग मूर्तिपूजकांचे महान शहर असा यांनी प्रयागराजचा उल्लेख केलेला आढळतो. यावरून इथे ब्राह्मणी परंपरांचा प्रभाव असल्याचेही दिसून येते. शेर शहा यांनी इथेच ग्रँड ट्रंक रोडची बांधणी केली होती, आणि त्यामुळे या प्रदेशाचे महत्त्वही वाढले. 16व्या शतकात अकबराने इलाहाबास असे या शहराचे नामकरण केले, या शहराला किल्लाबंद स्वरूप देत एक संरक्षित साम्राज्य केंद्र आणि महत्वाचे यात्रा स्थळ म्हणून नावारुपाला आणले.
प्रयागराजमधील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे
गंगा, यमुना, आणि सरस्वती या पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम प्रयागराजमध्येच आहे. सरस्वतीचे दर्शन तसे होत नाही, मात्र कुंभ मेळ्यात ती अवतरते. सरस्वती नदी म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञेचे प्रतीक आहे. या पवित्र त्रिवेणी संगामावर आपल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक इथे येतात. त्यामुळेच तर हे कुंभ मेळ्याचे मुख्य केंद्रही बनले आहे.
त्रिवेणी संगमाला भेट देणारे भाविक विशेष आध्यात्मिक वातावरणाची अनुभुती देणाऱ्या इथल्या विविध मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांनाही आवर्जून भेटी देतात. त्यांपैकीच एक श्री लेटे हुए हनुमानजी मंदिर हे दारागंजमध्ये आहे. हे मंदीर संत समर्थ गुरु रामदास यांनी स्थापन केले होते. या मंदिरात शिव पार्वती, गणेश, भैरव, दुर्गा, काली, आणि नवग्रहांच्या मूर्ती आहेत. याशिवाय, श्री राम जानकी आणि हरित माधव मंदिरे ही देखील इथली काही महत्त्वाची मंदिरे. अलोप शंकरी देवीचे मंदिर आणि नागवासुकी मंदिर हे देखील भाविकांमध्ये लोकप्रिय आहेत. हे मंदीर जे नाग देवतेला समर्पित आहे. प्रयागराज मध्ये 2025च्या महा कुंभमेळ्यासाठी आता या मंदिरांचा जिर्णोद्धार केला जातो आहे.
इथले शंकर विमान मांडपम हे 130 फूट उंच दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर आहे. या मंदिरात आदिशंकराचार्य, कामाक्षी देवी, आणि तिरुपति बालाजी यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. इथले आणखी एक मंदीर म्हणजे श्री वेणी माधव मंदिर. हे मंदीर प्रयागराजच्या बारा माधव मंदिरांमध्ये सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. प्रयाग यात्रा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या मंदीराला भेट देणे अनिवार्य असते. पौराणिक दृष्ट्या महत्वाचे असलेले अक्षयवट वृक्ष आणि पाताळपुरी मंदिर हे अलाहाबाद किल्ल्याजवळ स्थित आहेत, अक्षयवट या पवित्र वडाच्या झाडाचा उल्लेख आपल्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो. याशिवाय आणखी उल्लेख करावा अशी मंदिरे म्हणजे मनकामेश्वर मंदिर, दशाश्वमेध मंदिर, तक्षकनाथ मंदिर आणि सरस्वती कूप ही धार्मिक स्थळे. सरस्वती कूपच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मुल्यांचे जतन सर्वधन करण्याच्या उद्देशाने प्रयागराज मध्ये आयोजित होणाऱ्या 2025च्या महाकुंभसाठी त्याचा जिर्णोधार केला जात आहे. राम घाटावरील सायंकाळची गंगा आरती म्हणजे तर भान हरपायला लावणारा एक मंत्रमुग्ध करणारी विधीच आहे. आरतीचा जयघोष, दिवे आणि भक्तिभावाने ही आरती दररोज केली जाते आणि ही आरती म्हणजे निसर्गाच्या पंच महाभुतांचेच प्रतिक मानली जाते.
प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठ हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत जुने विद्यापीठ आहे. 23 सप्टेंबर 1887 रोजी या विद्यापीठाची स्थापन केली गेली होती. म्युअर सेंट्रल महाविद्यालय हा या विद्यापीठाच्या स्थापनेमागचा मूळ पाया. सर विल्यम म्युअर यांनी 9 डिसेंबर 1873 रोजी या महिविद्यालयाची स्थापन केली होती. प्रयागराज मधले सार्वजनिक ग्रंथालय, 1864 मध्ये स्थापन झाले होते, त्यानेतर 1878 मध्ये ते त्याच्या सध्याच्या इमारतीत पुनर्स्थापित केले गेले. या ग्रंथालयात आपल्याला दुर्मीळ हस्तलिखिते आणि पुस्तके पाहायला मिळतात. 1887 मध्ये राज्याच्या पहिल्या विधान परिषदेच्या बैठकीचे आयोजनही याच ग्रंथालयात झाले होते, त्यामुळेही या ग्रंथालयाला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
2019च्या कुंभमेळा, अद्वितीय यशाचा सोहळा
2019 मध्येही प्ररागराज मध्ये आयोजित झालेला कुंभ मेळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता. या मेळ्याला तब्बल 24 कोटी भाविकांनी भेट दिली होती. या मेळ्याच्या यशस्वी आयोजनामुळेच, हा मेळा जागतिक स्तरावर आयोजन कौशल्याबद्दल प्रशंसेला पात्र ठरला होता. 182 देशांमधील नेते, 70 राजदूत, आणि 3,200 अनिवासी भारतीय सहभागी झाले होते. त्या वेळी आयोजित या सोहळ्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स अंतर्गत तीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले. सर्वांत मोठी बस परेड, पेंट माय सिटी या उपक्रमाअंतर्गत सर्वांत मोठा सार्वजनिक चित्रकलेचा उपक्रम, आणि सर्वांत मोठी स्वच्छता विषयक व्यवस्था हेच ते तीन जागतिक विक्रम.
हा मेळा पवित्र तिवेणा संगमाजवळच्या 3,200 हेक्टरमध्ये पसरलेल्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे मेळ्याच्या परिसराला जगातील सर्वांत मोठ्या तात्पुरत्या शहराचेच रुप प्राप्त झाले होते. या मेळाव्यानिमित्ताने केलेल्या विस्तृत सुशोभीकरणाअंतर्गत 2 लाख झाडांचे रोपण, संकल्पनाधारीत प्रवेशद्वारांची उभारणी आणि 10 किमी परिसरातील रस्त्यांच्या सुधारणा अशा पायाभूत सेवा सुविधांच्या विकासकामांचा समावेश होता. या मेळ्याच्या परिसरात 1,000 पेक्षा जास्त कॅमेरे, 62 पोलीस चौक्या, आणि 10 लाख कल्पवासीयांसाठी अन्नधान्य पुरवठा योजना तयार करण्यात आली होती. एकूणात अशा प्रकारच्या समृद्ध आयोजामुळे 2019 सालचा प्रयागराज कुंभमेळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा आदर्श मिलाफ साधरणारा आणि प्रयागराजच्या माध्यमातून मोठ्या स्वरुपातील सोळ्याच्या व्यवस्थेपनेचे आदर्श उदाहरण म्हणून प्रस्थापित करणारा मेळा ठरला.
सारांश
आता 2025 मध्ये प्रयागराज इथे आयोजित होणारा महाकुंभ मेळा हा निश्चितच एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाला नवोन्मेषाचा स्पर्ष तर असेल, पण त्यासोबतच यापूर्वी आयोजित केल्या गेलेल्या मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनाचा अनुभवही यंदाच्या आयोजनाचा भक्कम पाया असणार आहे. प्रयागराज शहराची समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नगररचना, आणि त्याला अत्याधुनिक सोयी सुविधांची दिलेली जोड, या मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांना श्रद्धा, एकता आणि भक्तीचा अद्वितीय अनुभव मिळवून देणारा ठरेल. या मेळ्याअंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांसाठी काटेकोर नियोजन केले असून, त्यात परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सुयोग्य सांगडही घातली गेली आहे, त्यामुळेच हा कुंभमेळा आयोजनाच्या बाबतीत एका नव्या उंचीवर पोहचेल, आणि त्यातूनच मोठ्या स्वरुपातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळ्यांचे आयोजन कसे करावे याचा नवा जागतिक मापदंडही निश्चितच प्रस्थापित होईल. या मेळ्याच्या निमित्ताने पवित्र त्रिवेणी संगमावर पुन्हा एकदा जेव्हा लाखो भाविक आणि यात्रेकरू एकत्र येतील, तो प्रसंग अर्थात 2025चा महाकुंभ मेळा म्हणजे भारताच्या शाश्वत आध्यात्मिक वारशाचे तसेच विविधता आणि सलोखा साजरा करण्याच्या वचनबद्धतेचे एक शक्तिशाली प्रतीक म्हणून कायमचा ठसा उमटवेल.
References
Download in PDF
***
H.Akude/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084414)
Visitor Counter : 40