ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हे सहकाऱ्यांसाठीच्या क्षमता निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट : सचिव, ग्राहक व्यवहार विभाग
Posted On:
12 DEC 2024 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
न्यायालयीन प्रक्रिया-पूर्व टप्प्यावर तक्रार निवारण पुनर्परिभाषित करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा भाग म्हणून ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर आपल्या सहकाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे.
क्षमता निर्मिती कार्यक्रमात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांसाठी विशेष उच्च कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांचा समावेश आहे . राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहकाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे, ग्राहकांच्या तक्रारी प्रभावीपणे सोडवण्यासाठी सक्षम बनवणे आणि हेल्पलाईनद्वारे सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. विभागाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, हा उपक्रम ग्राहक तक्रार निवारणामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांची क्षमता बळकट करण्याचा प्रयत्न करतो, ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा आणि सहाय्य मिळेल याची काळजी घेतो.
या प्रयत्नात, विभागाने 11 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या सहकाऱ्याना ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यासाठी अमेझॉन इंडियाची मदत घेतली आहे. सहकाऱ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, व्यावसायिक दृष्टीकोन आणि अत्यावश्यक ग्राहक सेवा वर्तन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारा 40-तासांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पाडला. क्षमता निर्मिती कार्यक्रम पूर्ण झाल्यावर, सहभागींना ग्राहक व्यवहार विभाग आणि अमेझॉन इंडियाकडून संयुक्त प्रमाणपत्र प्राप्त होईल. हे प्रमाणपत्र ग्राहक तक्रार निवारणातील त्यांची वर्धित कौशल्ये आणि ज्ञान यांचा गौरव असून ते त्यांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनद्वारे उत्कृष्ट समर्थन प्रदान करण्यास सक्षम करते. देशभरातील 17 भाषांमध्ये (म्हणजे हिंदी, इंग्रजी, काश्मिरी, पंजाबी, नेपाळी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, मैथली, संथाली , बंगाली, ओडिया, आसामी, मणिपुरी) देण्यात येत असून सध्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचे व्यवस्थापन पाहते.
यावेळी बोलताना, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे म्हणाल्या, “सरकार ग्राहक हक्क कायम राखण्याच्या आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. यासाठी जबाबदारी, पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढवण्यासाठी तक्रारी ऐकण्याचा आणि त्यांचे निराकरण करण्याचा अधिकार आवश्यक आहे. हेल्पलाईनची कामगिरी उंचावणे हे अमेझॉन इंडियाद्वारे दिले जाणाऱ्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे आणि क्षमता निर्मिती कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यावर दरमहा एक लाखाहून अधिक तक्रारी येतात. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सहयोगींच्या नियमित प्रशिक्षणामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी त्यांचे संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत करेल आणि ग्राहकांना विनाव्यत्यय विवाद निवारणाचा अनुभव मिळेल.
ॲमेझॉनच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक धोरण उपाध्यक्ष सुझन पॉइंटर यांनी सांगितले, “ॲमेझॉनमध्ये ग्राहकाचा ध्यास हा सर्व बाबींच्या केंद्रस्थानी असतो. भविष्यातील ई-कॉमर्सची वाढ ग्राहकांचे सक्षमीकरण व शिक्षणावर अवलंबून आहे यावर आमचा विश्वास आहे. ग्राहक व्यवहार विभागाला आम्ही व्यवहाराच्या आमच्या उत्तम सवयींची माहिती देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यातून ग्राहक तक्रार निवारणाची व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या आमच्या महत्त्वाच्या ध्येयाला पाठबळ मिळेल. यामुळे विश्वासार्हता वाढून आणखी ग्राहक ऑनलाईन खरेदीकडे वळतील.”
तसेच, ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय विधी विद्यापीठ, दिल्लीच्या सहयोगाने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (एनसीएच) च्या भागीदारांसाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा 30 नोव्हेंबर 2024 रोजी एनएलयूडी कॅम्पस, द्वारका, नवी दिल्ली इथे पार पडली. यातील चार सत्रांपैकी दोन सत्रांमध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 शी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले होते. ग्राहक-केंद्रित समकालीन समस्या जसे की दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, ई-कॉमर्स, झटपट कॉमर्स, काळे व्यवहार, ग्रीनवॉशिंग (पर्यावरणस्नेही असल्याची दिशाभूल), हेल्थवॉशिंग (आरोग्यविषयक दिशाभूल) आणि दुय्यम जाहिरातींचा त्यात समावेश होता. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भागीदारांना आवश्यक ज्ञान व कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ही सत्रे आयोजित करण्यात आली होती.
क्षमता बांधणी कार्यक्रम आणि परिवर्तनकारी बदलांसह एनसीएचमध्ये तंत्रज्ञानाधारित सुधारणा घडवून आणल्यामुळे एनसीएच हे देशभरातील ग्राहकांना न्यायालयीन कारवाईपूर्वी तक्रार निवारणाची सुविधा देणारी एकछत्री व्यवस्था म्हणून उदयाला येईल.
* * *
S.Patil/Sushma/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083736)
Visitor Counter : 36