संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांच्या रशियन समपदस्थांच्या सहअध्यक्षतेत मॉस्को येथे लष्कर आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्याबाबतची भारत रशिया आंतर सरकारी आयोगाची 21 वी बैठक संपन्न

Posted On: 10 DEC 2024 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024


लष्कर आणि लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्याबाबतची भारत रशिया आंतर सरकारी आयोगाची 21 वी बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्या सहअध्यक्षतेत मॉस्कोमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी झाली. भारत रशिया द्विपक्षीय संबंध मजबूत असल्याच्या मुद्द्यावर भर देत या विशेष व विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या जबाबदाऱ्या नेहमीच पार पाडल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

देशांतर्गत संरक्षण उद्योगाचा विविध क्षेत्रांमध्ये विस्तार व यासाठी औद्योगिक सहकार्य मिळवण्याचा भारत सरकारचा निर्धार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याच्या नव्या संधी रशियातील उद्योजकांना उपलब्ध असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. रशियासोबतच्या खास व विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीप्रती भारताच्या उत्तरदायित्वाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.  

परस्पर विश्वासावर आधारित  दोन्ही देशांमधले संबंध आणखी मजबूत करण्याची गरज रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी बोलून दाखविली. 'आयएनएस तुशील' ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याबद्दल त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की 2021-31 या दहा वर्षांच्या कालावधीसाठी केलेला लष्करी तांत्रिक सहकार्य करार 'मेक इन इंडिया' अभियानाला आवश्यक गती देईल. 2025 मध्ये होऊ घातलेल्या लष्कर व लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 22 व्या बैठकीचे निमंत्रण राजनाथ सिंह यांनी बेलोसोव्ह यांना दिले. बेलोसोव्ह यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

बैठकीच्या शेवटी  दोन्ही नेत्यांनी लष्कर व लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्याबाबतच्या 21 व्या बैठकीतल्या ठरावाच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. यामध्ये दोन्ही देशांतल्या सहकार्याच्या वर्तमान व भविष्यकालिन क्षेत्रांचा ठळकपणे उल्लेख आहे.  

या बैठकीपूर्वी संरक्षण मंत्र्यांनी मॉस्को येथे  रशियन संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित गार्ड ऑफ ऑनरची मानवंदना स्वीकारली. तत्पूर्वी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे स्मारक असलेल्या ‘द टोम्ब ऑफ द अननोन सोल्जर’ इथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले.

S.Kane/S.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2082954) Visitor Counter : 24


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil