उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अतिशय दुर्गम कानाकोपऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याची भारताच्या क्षमतेचे जगाला आश्चर्य  वाटत आहे - उपराष्ट्रपती


2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी हे फक्त स्वप्न नव्हे, तर आपले उद्दिष्ट आहे- उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

मोतीहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींनी केले मार्गदर्शन

Posted On: 07 DEC 2024 5:26PM by PIB Mumbai

 

140 कोटी लोकसंख्येच्या भारतात अतिशय दुर्गम कानाकोपऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याची भारताची क्षमता पाहून जग अचंबित झाले आहे, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा वितरण साधले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

बिहारमध्ये मोतीहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षान्त सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले, "2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी हे फक्त स्वप्न नव्हे, तर आपले उद्दिष्ट आहे. तथापि, या उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी प्रत्येकाने मोठा त्याग करण्याची आणि योगदान देण्याची गरज आहे. आता याचा विचार करा- विकसित भारताच्या निर्मितीसाठी, सध्याचे दरडोई उत्पन्न आठपट वाढले पाहिजे. लोक नेहमी विचारतात, "यासाठी नागरिक काय करू शकतात?" हा खरोखरच महत्त्वाचा प्रश्न आहे.''

आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे महत्त्व  अधोरेखित करताना ते म्हणाले, आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचीही आपण आयात करतो तेव्हा, त्याचे तीन प्रमुख तोटे होतात. पहिले म्हणजे, परकीय चलन विनाकारण देशातून बाहेर जाते. दुसरे म्हणजे, आपण छोट्यामोठ्या आर्थिक फायद्यासाठी परदेशातून विविध वस्तू आयात करतो- जसे की- रंग, शर्ट, फर्निचर, पतंग, दिवे, मेणबत्त्या, पडदे अशा कित्येक वस्तू. तथापि, याच वस्तूंचे देशांतर्गत  उत्पादन झाले असते तर किती लोकांना रोजगार मिळाला असता, याचा विचार करून पाहा. या वस्तूंची आयात करून आपण एकप्रकारे आपल्याच लोकांचे काम हिरावून घेतो. तिसरे म्हणजे, अशा प्रकारांमुळे देशांतर्गत  उद्योजकांची प्रगती खुंटते. याचा अर्थ, आजही या प्रश्नांवर तोड काढण्यासाठी एखादा  सामान्य नागरिकही खूप काही करू शकतो.''

व्याख्यानाचा समारोप करताना उपराष्ट्रपतींनी, विद्यार्थ्यांना अभिनव विचारांसाठी आणि नवीन संधीचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

***

S.Kakade/J.Waishampayan/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082005) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Tamil , Malayalam