शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय सांकेतिक भाषेसाठी पीएमइविद्या डीटीएच 24x7 चॅनेल क्रमांक 31 चे केले उद्घाटन
चॅनेल 31असामान्य प्रतिभा जगासमोर आणेल आणि कर्णबधिरांचे जग आणि सामान्य जग यांच्यातील तफावत कमी करेल- धर्मेंद्र प्रधान
Posted On:
06 DEC 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय सांकेतिक भाषेसाठी (आयएसएल) पीएमइविद्या डीटीएच 24x7 चॅनल क्रमांक 31 चे उद्घाटन केले.


दिव्यंगत्वाच्या व्याख्येत 7 वरून 21 प्रकारांचा समावेश केल्यामुळे कायदेशीर चौकट अधिक व्यापक बनली आहे असे प्रधान म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी) ने विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाला (CwSN) प्राधान्य दिले आहे. हे अधिक समावेशक शिक्षण प्रणालीकडे वळल्याचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले.
आवाज हेच केवळ संवादाचे माध्यम नाही, सांकेतिक भाषेसारखे पर्याय सर्वांसाठी समान संधीची ग्वाही देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे त्यांनी सांगितले. जागतिक मानकांनुसार आयएसएल चा विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतातील कर्णबधिर लोकसंख्येला आधार देण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आयएसएल शिकावे अशी कल्पना त्यांनी मांडली. यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
नृत्य आणि नाटक यांसारख्या सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये असलेल्या भारतीय सांकेतिक भाषेच्या प्रभावाकडेही प्रधान यांनी लक्ष वेधले. दिव्यांगांमधील प्रचंड क्षमता दाखवण्यासाठी काही असामान्य व्यक्तींची उदाहरणे त्यांनी दिली. सहजसाध्य संप्रेषणासाठी आणि ही क्षमता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनेल 31 एका सेतूसारखे काम करणार असल्यामुळे समाज अधिक समावेशक आणि प्रगतीशील बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चॅनेल 31 लोकप्रिय करण्यासाठी आणि भारतीय सांकेतिक भाषेचे जगासाठी प्रवेशद्वार म्हणून या वाहिनीची भारतभर ओळख तयार करण्याचे आवाहन प्रधान यांनी सर्व संबंधितांना केले. भारतीय सांकेतिक भाषेच्या प्रचारासाठी समर्पित पीएम ई-विद्या चॅनेलची संकल्पना आयएसए ला एक भाषा तसेच शालेय विषय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला भाषा शिकण्याची संधी मिळेल. शालेय मुलांसाठी (केंद्रीय आणि राज्य अभ्यासक्रम), शिक्षक, प्रशिक्षक आणि इतर भागधारकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, मानसिक आरोग्य, वर्गवार अभ्यासक्रम सामग्री, संभाषण कौशल्ये, तसेच जाहिरात या क्षेत्रातील शैक्षणिक सामग्री 24x7 चॅनेल 31 वरून प्रसारित होईल. सर्वांसाठी हिंदी, इंग्रजी इत्यादी शाब्दिक भाषांप्रमाणेच सांकेतिक भाषा हा विषय म्हणून YouTube वर देखील शिकण्यासाठी सामग्री उपलब्ध असेल.
S.Kakade/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2081751)