अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (एनएमडीएफसी) तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांच्यात उद्या होणार सामंजस्य करार

Posted On: 06 DEC 2024 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  4 डिसेंबर 2024

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाअंतर्गत येणारे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (एनएमडीएफसी)  आणि  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) यांच्यात उद्या 7 डिसेंबर 2024 रोजी  सामंजस्य करार होणार आहे. समाजातील उपेक्षित घटकांमध्ये उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी होत असलेल्या या करारावर उद्या नवी दिल्ली येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या नालंदा सभागृहात उद्या स्वाक्षऱ्या केल्या जातील.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू असतील. यावेळी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव  डॉ. चंद्रशेखर कुमार, डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, एनएमडीएफसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. आभा राणी सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या करारामुळे अल्पसंख्याक आणि वंचितांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाला एक नवीन परिमाण लाभेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी एनएमडीएफसी आणि डिक्की यांचे एकत्रित कौशल्य आणि साधनसंपत्तीचा उपयोग केला जाईल. एनएमडीएफसी आणि डिक्की यांच्यातील या सहकार्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे. उद्योगधंद्यांना चालना देणे म्हणजे लोकांना रोजगारनिर्माते बनवून इतरांसमोर एक आदर्श घालून देणे आहे, त्यामुळे देशभरात उपेक्षितांच्या जीवनात स्थित्यंतर घडून येईल.

एनएमडीएफसीचा स्थापना 1994 मध्ये झाली. तेव्हापासून या महामंडळाने स्वयंरोजगार आणि उत्पन्न निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या कामांसाठी सवलतीने वित्तपुरवठा करण्याच्या आदेशाचे पालन करत 9,000 कोटी रूपयांचा पतपुरवठा करत 24 लाख कुटुंबांचे जीवन बदलून टाकले आहे.

वंचित गटांमध्ये उद्योजकता रुजवण्यासाठी डिक्कीचे प्रयत्न नावाजले गेले आहेत. व्यावसायिक नेतृत्व विकसित करणे आणि शाश्वत विकासाच्या संधी निर्माण करणे यासाठी डिक्की कार्यरत आहे. हा करार करण्यामागे दोन्ही संस्थांची उद्दिष्ट्ये अशी:

  • जागरूकता निर्माण करणे: आर्थिक विकासासाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.
  • आर्थिक साहाय्य देणे: इतरांसाठी रोजगार निर्माण करणारे स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी उद्योजकांना सक्षम करा.
  • धोरण राबवणारी प्रक्रिया: शाश्वत व्यवसाय पद्धती आणि विकासासाठी धोरणांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया खालपासून वरपर्यंत सुलभ करणे.
  • तरुणांना प्रोत्साहन देणे: एक उपयुक्त करिअर म्हणून उद्योजकतेकडे वळण्यासाठी महत्त्वाकांक्षी युवकांना प्रोत्साहन द्या.

सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून एनएमडीएफसी आणि डिक्की यांनी निश्चित केलेल्या उद्योजकांना सवलतीने कर्ज दिले जाईल. त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करून आर्थिक वाढीस हातभार लावता येईल. शाश्वत विकासासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि धोरणात्मक सुधारणा करणारा हा करार आहे.

समाजातील उपेक्षित घटकांना सक्षम करण्यासाठी केलेल्या सहयोगी प्रयत्नांचे एक आदर्श उदाहरण म्हणून एनएमडीएफसी आणि डिक्की यांची भागीदारी काम करेल, अशी अपेक्षा आहे. समावेशक आणि  शाश्वत विकासासाठी सामूहिक कृतीचे महत्त्व त्यामुळे विशद होते.

 

 

S.Kakade/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2081526) Visitor Counter : 26


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil