संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाकडून कोची किनाऱ्याजवळ 11 व्या राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सरावाचे आयोजन
Posted On:
29 NOV 2024 3:46PM by PIB Mumbai
भारतीय तटरक्षक दलाने 29 नोव्हेंबर 2024 रोजी कोची किनाऱ्याजवळ 11 व्या राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सरावाचे (SAREX-2024) आयोजन केले. दोन दिवसांच्या या सरावाचे उद्घाटन 28 नोव्हेंबर रोजी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या हस्ते आणि महासंचालक परमेश शिवमणी यांच्या उपस्थितीत झाले. 'प्रादेशिक सहयोगाद्वारे शोध आणि बचाव क्षमता वृद्धिंगत करणे' ही या सरावाची संकल्पना असून यातून सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी विविध चर्चासत्र, कार्यशाळाही झाल्या. सरकारी संस्था, मंत्रालये, सशस्त्र दल यातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, इतर संबंधित आणि परदेशी प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सागरी सराव होता. यासाठी विविध संस्थांच्या नौका आणि विमाने मोठ्या प्रमाणावर कोची किनाऱ्यावर दाखल झाल्या.
सरावाच्या आराखड्यानुसार 250 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान गंभीर तांत्रिक बिघाडामुळे संकटात सापडले गेल्याचे मानले गेले. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला आणि कोचीच्या वायव्येस अंदाजे 150 नॉटिकल मैल अंतरावर रडारवरून ते गायब झाल्याचे मानण्यात आले. सरावाअंतर्गत या आधारे त्वरित सामूहिक शोध मोहीम सुरु करण्यात आली. संसाधने जलद तैनात करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी पाहायला मिळाले. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय हवाई दल यांच्या नौका आणि विमान, कोचीन बंदर प्राधिकरणाच्या खेचहोड्या, कोची जल मेट्रोकडून तीन वॉटर मेट्रो, एक गरुड बचाव व आपत्कालीन विमान आणि केरळ राज्य प्रशासनाची जल रुग्णवाहिका यासह संसाधनांच्या अखंड उपयोजनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ठळक बाबी पुढीलप्रमाणे :
- हवाई दलाच्या विमानांद्वारे आणि भारतीय तटरक्षक दलाच्या नौकांद्वारे जीवरक्षक तराफा योग्य प्रकारे फेकणे
- प्रगत हलक्या हेलिकॉप्टरद्वारे प्रवाशांची सुटका
- सागरी बचावासाठी असलेल्या जेसन क्रॅडल(पाळणा)तंत्राचा वापर करून विमानातील कर्मचाऱ्यांची सुटका
- जीवरक्षक बोटी देण्यासाठी ड्रोनची नाविन्यपूर्ण तैनाती
हा सराव यशस्वीपणे पार पडला तसेच यातून सहभागी संस्थांमधील उच्च पातळीवरील समन्वय आणि सज्जता दिसून आली.
सामूहिक शोध मोहीम (एमआरओ) हाती घेण्यासाठी मानक कार्यपद्धती आणि सर्वोत्तम पद्धती प्रमाणित करणे हा या सरावामागचा उद्देश होता.
मोठ्या प्रमाणावर सागरी आकस्मिक स्थितीला तोंड देण्यासाठी परस्पर सामंजस्य, सहकार्य वृद्धिंगत करणे आणि प्रभावी शोधतंत्रांचे आदानप्रदान करणे, या दृष्टीने हा सराव महत्त्वपूर्ण ठरला. या उपक्रमात राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव मंडळाचे सदस्य आणि 38 प्रतिष्ठित परदेशी निरीक्षक सहभागी झाले होते.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय तटरक्षक दल, सागरी शोध आणि बचाव यासाठी उत्तम आराखडा तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना देणारी एक अग्रगण्य सागरी संस्था म्हणून उदयास आली आहे. विविध भागधारकांशी सातत्याने सहयोग साधत भारतीय तटरक्षक दल सागरी सुरक्षा वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सागर अर्थात क्षेत्रामध्ये सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुरूप हे उपक्रम असून ते जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह आणि सक्रिय सागरी भागीदार म्हणून भारताची प्रतिमा उंचावत आहेत.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079137)
Visitor Counter : 12