माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘रावसाहेब’ आणि ‘श्रीकांत’ या दोन असामान्य चित्रपटांनी 55 व्या इफ्फीमधील भारतीय दालन विभागाला दिली प्रकाशाची झळाळी
‘रावसाहेब’ – पर्यावरणविषयक थरारकपट, माणूस आणि प्राणी यांच्यातील झगड्याचे नव्या दृष्टीकोनातून दर्शन घडवणारा चित्रपट
“श्रीकांतची कथा केवळ दिव्यांग व्यक्तींसाठीच नव्हे तर स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे”: दिग्दर्शक तुषार हिरानंदानी
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मधील प्रतिष्ठित भारतीय दालन विभागामध्ये सादर झालेल्या रावसाहेब (मराठी) आणि श्रीकांत (हिंदी) या दोन प्रभावशाली चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या लक्षवेधक कथा आणि अनोख्या दृष्टिकोनासह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते निखील महाजन यांनी दिग्दर्शित केलेला रावसाहेब हा चित्रपट माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा मांडतो.इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाजन म्हणाले, “रावसाहेब हा केवळ एक चित्रपट नव्हे; वास्तविक जगातील संकटाचे ते प्रतिबिंब आहे. या विषयावर अधिक विस्तृत चर्चा करण्याच्या गरजेबाबत प्रेक्षकांना आवाहन करण्यासाठी आम्हांला थरारकपटाचा वापर करून या मुद्द्याची निकड मांडायची होती.” हा चित्रपट यावर्षी इफ्फी मध्ये प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार मिळवण्याच्या स्पर्धेत देखील आहे.
महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या धोकादायक पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट मानवता आणि निसर्ग यांच्यातील नाजूक संतुलन ठळकपणे मांडण्यासाठी पर्यावरणीय थराराचा वापर करतो.चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणून जंगलाचा वापर करण्यासंदर्भात बोलताना महाजन म्हणाले, “हा चित्रपट खऱ्या जंगलात, चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलात चित्रित झाला. त्यामुळे चित्रपटाच्या मांडणीला वास्तवाचा आधार आहे. चित्रीकरण करताना आजूबाजूला सर्वत्र वाघ फिरत होते आणि एका मोठ्या संचासह चित्रीकरण करण्यासाठी तो जोखमीचा भाग होता. त्यामुळे चित्रपटाला वास्तवतेचा स्पर्श देतानाच तेथे चित्रीकरणाचे काम करणे हे एक सर्वात कठीण आव्हान होते. आम्ही जंगलाचे असे चित्रण केले की ते कथेचा अविभाज्य भाग बनले.”

चित्रिकरणादरम्यानचे एक अनोखे आव्हान त्यांनी अधोरेखित केले: “आम्ही केवळ एकाच दृश्यात वाघ दाखवू शकलो, पण त्याच्या निरंतर अस्तित्वाची जाणीव आम्हाला निर्माण करावी लागली. ध्वनी रचना आणि दृश्य घटकांच्या मदतीने आम्ही तणावाचे आणि संशयाचे वातावरण निर्माण केले.”
विदर्भात मानव-वन्यजीव यांच्यातील झगड्यावर दोन वर्षे व्यापक संशोधन करुन तयार झालेला हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित आहे. ‘रावसाहेब’ या मुद्द्यावर निःपक्षपातीपणे विविध दृष्टीकोन मांडतो. “मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्व आणि समतोल नातेसंबंधांची गरज यावर अधिक भर देत वास्तववादी आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून हा विषय मांडणे हे आमचे ध्येय होते,” महाजन यांनी स्पष्ट केले.
इफ्फी मध्ये आज प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट, ‘श्रीकांत’ हा स्थितिस्थापक, आनंदी वृत्ती आणि आशेचा प्रवास प्रेक्षकांना दाखवतो. श्रीकांत बोल्ला, दृष्टिहीन उद्योगपती आणि बोल्लांट इंडस्ट्रीजचे संस्थापक यांच्या जीवनावर आधारित असलेला हा हिंदी चित्रपट मानवी आत्मा आणि दृढनिश्चयाचा एक प्रेरणादायी पुरावा आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि निधी हिरानंदानी निर्मित, चित्रपटात विनोद आणि नाट्य यांचे मिश्रण करून दृष्टिहीन श्रीकांतचा संघर्ष आणि सामाजिक मर्यादांविरुद्धच्या विजयाचे चित्रण केले आहे. यावर्षी इफ्फीमध्ये प्रतिष्ठित आयसीएफटी युनेस्को गांधी पदकासाठीही हा चित्रपट स्पर्धेमध्ये आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना निधी हिरानंदानी यांनी या चित्रपटाचे वर्णन चिकाटी, जिद्दीची वैश्विक कथा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “श्रीकांत हा समाजाने लादलेल्या अडथळ्यांना तोडून, समानतेच्या रूपाने सगळ्यांना पाहिले जावे आणि प्रामाणिक जीवन जगताना माणसाला द्याव्या लागत असेलेल्या लढ्याचा चित्रपट आहे. महामारीच्या आव्हानांमधून बाहेर पडताना, आशा आणि विश्वास परत आणणारी कथा सांगणे महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटले.’’
‘सांड की आंख’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी इफ्फीमध्ये परतल्याबद्दल उत्साह व्यक्त केला. “श्रीकांतची कथा केवळ दिव्यांग व्यक्तींसाठीच नाही तर त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहे. आम्ही त्याला एक संबंधित व्यक्ती म्हणून चित्रित केले, अगदी त्याच्या संघर्षाचे आणि अपयशाचे क्षण देखील दाखवले, यामुळे कथानकाला सत्यतेची जोड मिळाली आहे. ”

श्रीकांतला लवचिकता आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून सादर करून, हा चित्रपट दृष्टिहीन व्यक्तींबद्दलच्या पूर्वकल्पित कल्पनांना आव्हान दिले गेले आहे. “हा केवळ अपंगत्वावरील चित्रपट नाही तर मानवामध्ये असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा, आणि अगम्य भावनेविषयीचा चित्रपट आहे,” असेही तुषार हिरानंदानी यांनी यावेळी सांगितले.
‘रावसाहेब’ आणि ‘श्रीकांत’ हे दोन्ही चित्रपट परिवर्तनाची प्रेरणा देत गंभीर सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी कथाकथन किती ताकदीने केले आहे, हे दर्शवतात. इफ्फीमध्ये या दोन्ही चित्रपटांचे झालेले उत्स्फूर्त स्वागत देशातील विकसित झाले ल्या सिनेमॅटिक’ परिघावर प्रकाश टाकते.
प्रस्तुत पत्रकार परिषद येथे पाहता येईल:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Tupe/Sanjana/Suvarna/Darshana | IFFI 55
(रिलीज़ आईडी: 2078667)
आगंतुक पटल : 51