इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल नवोन्मेषाद्वारे जीवनाचे सक्षमीकरण : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये सीएससीची चमकदार कामगिरी
Posted On:
28 NOV 2024 10:24AM by PIB Mumbai
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (आयआयटीएफ) कक्ष क्रमांक 14 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्टॉल उभारला आहे. याअंतर्गत सीएससी अर्थात सामान्य सेवा केंद्राचा (कॉमन सर्व्हिस सेंटर) स्टॉल डिजिटल आणि समुदाय सेवांच्या विस्तृत श्रेणींचे प्रदर्शन घडवतो. ग्रामीण ईस्टोअर, सीएससी अकादमी, डिजीपे, आधारशी संबंधित सेवा आणि इतर प्रमुख उपक्रमांचा यांचा यात समावेश आहे. सीएससी पुरवत असलेल्या सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आपल्या सक्षमीकरणासाठी या सेवांचा लाभ अधिकाधिक लोकांना घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
स्टॉलमागचे उत्साही नेतृत्व
दिल्लीचे सिद्धार्थ आणि विकास हे दोघे ग्रामस्तरीय उद्योजक युवा या स्टॉलचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे समर्पण आणि प्रतिबद्धता डिजिटल सेवांची परिवर्तन घडवणारी शक्ती दर्शवते. आपल्या समुदायांची सेवा करून त्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सिद्धार्थ : 22 वर्षांचा द्रष्टा
सिद्धार्थ हा 22 वर्षांचा उद्योजक असून त्याने वर्ष 2020 मध्ये सीएससी केंद्र सुरू केले आहे. दिल्लीतल्या मंडावली येथे तो हे केंद्र चालवतो. 12वी पूर्ण होताच त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. अनेक आव्हाने असूनही सीएससी सेवांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग करून त्याने परिस्थिती पालटली. आज, सिद्धार्थ मोठ्या कार्यक्षमतेने आधार नोंदणी, DigiPay आणि ग्रामीण eStore सारख्या सेवा व्यवस्थापित करतो. त्याचा हा प्रवास म्हणजे योग्य संधींचा फायदा घेऊन तरुण आपले जीवन कसे बदलवू शकतात, त्याचे उदाहरण आहे.
विकास : परिस्थितीवर मात करण्याची जिद्द असेल तर यश लाभते
50 वर्षांच्या विकास, जीवनात अनेक आव्हानांना सामोरे गेले आहेत. बालपणी पोलिओ झाल्याने त्यांना चालताना त्रास होतो. मात्र त्यांचा निर्धार कधीच डगमगला नाही. दिल्लीतल्या रोहिणी परिसरात त्यांनी सीएससी केंद्र सुरू केले. शारीरिक मर्यादा प्रेरणा आणि विजिगीषू वृत्तीला बांध घालू शकत नाहीत, याचे उत्तम उदाहरण विकासाचे जीवन आहे. आपल्या केंद्रामार्फत ते आधार नोंदणी, डिजी पे द्वारे अविरत व्यवहार, इतर सरकारी योजना व अनेक महत्त्वपूर्ण सेवा लोकांपर्यंत पोहोचवतात.
सीएससी स्टॉल: डिजिटल सक्षमीकरणाचे प्रतीक
आयआयटीएफमध्ये उभारण्यात आलेल्या सीएससी स्टॉलला भेट दिल्यास, उत्पादनांच्या सुलभ खरेदीविक्रीची सुविधा पुरवणारे ग्रामीण ईस्टोअर, कॅशलेस व्यवहारांसाठी डिजीपे आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणारे सीएससी अकादमीसारखे कार्यक्रम व त्यातून निर्माण होणाऱ्या संधी पाहू शकतात. सिद्धार्थ आणि विकास यांच्यासारख्या ग्रामस्तरीय उद्योजकांचे प्रयत्न डिजिटल सेवा, दरी कशी सांधू शकतात आणि प्रतिकूल परिस्थितीत व्यक्तीला कसे सक्षम बनवू शकतात, याचे उदाहरण आहे.
समाजासाठी आदर्श
डिजिटल सेवा ही केवळ उपजीविकेची साधने नसून समाजातील प्रत्येक घटकाला उन्नत करण्याचे साधन आहे, हे सिद्धार्थ आणि विकास यांचा प्रेरणादायी प्रवास स्पष्ट करतो. त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे ते आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक परिणाम साधण्याची आकांक्षा असलेल्या असंख्य इतरांसाठी आदर्श बनले आहेत.
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामधील सीएससी स्टॉल डिजिटल इंडिया उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या यशाचे उदाहरण आहे. चिकाटी असल्यास आणि योग्य संधी मिळाल्यास आव्हानांवर मात करून कसे यश मिळवता येते हे सिद्धार्थ आणि विकास यांच्या कथा आपल्याला शिकवतात. सीएससी, डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्यासोबतच देशभरातील लोकांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनण्यासाठी प्रेरित करते.
***
H.Akude/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078384)
Visitor Counter : 12