माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 7

यशस्वी चित्रपट करण्यासाठी तुम्ही तुमचा संकोच आणि भीती सोडून द्यावी आणि चमूत एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवावा: फिलिप नॉयस


तुमची पटकथा जितकी चांगली आहे तितकेच तुम्ही दिग्दर्शक म्हणून चांगले आहात: नॉयस

आद्य चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांनी 55 व्या इफ्फीमध्ये ' नवीन हॉलीवूडमध्ये‌ यशस्वी कसे व्हावे’ या विषयावरील मास्टरक्लासला संबोधित केले

#IFFIWood, 25 नोव्‍हेंबर 2024

 

नजिकच्या सर्कसमध्ये रिंगमास्टर बनण्याच्या इच्छेपासून ते हॉलिवूडच्या चकचकीत आणि ग्लॅमरस पण आव्हानात्मक जगात दिग्दर्शक होण्यापर्यंतचा दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉयसचा प्रवास ही धैर्य आणि चिकाटीची विस्मयकारक कथा आहे.

ख्यातनाम चित्रपट निर्माते फिलीप नॉयस, ज्यांना यावर्षीच्या सत्यजित राय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, त्यांनी आज गोव्यातील कला अकादमी येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) “नवीन हॉलिवूडमध्ये यशस्वी कसे व्हावे” या विषयावर मास्टरक्लास घेतला.

देशभरातील उत्साही तरुण चित्रपट निर्मात्यांनी खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाला संबोधित करताना, नॉयस यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना अनेक खुब्या सांगितल्या. "हॉलिवूडमध्ये ठसा उमटवण्यासाठी  काही अडथळे पार करावे लागतात", नॉयस म्हणाले. “गेल्या काही वर्षांत, मी हॉलिवूडमध्ये टिकून राहण्याची काही व्यापारी रहस्ये शिकलो आहे. चमूतील सदस्यांचा एकमेकांवरील विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.” चित्रपट सुरू होण्यापूर्वी ते त्यांच्या चित्रपट निर्मिती चमूच्या प्रत्येक सदस्यासोबत खेळत असलेल्या अंध खेळाचे उदाहरण देऊन ते म्हणाले, “तुम्हाला तुमचा संकोच आणि भीती सोडून द्यावी लागेल आणि चित्रपट यशस्वी होण्यासाठी एकमेकांवर पूर्ण आणि निखळ विश्वास ठेवावा लागेल. शेवटी हे सर्व खात्री आणि विश्वासाशी निगडित आहे. ”

जर तुम्हाला योग्य चमू आणि योग्य कल्पना सापडली तर तुम्ही एक उत्तम चित्रपट बनवू शकता”, असे निपुण चित्रपट निर्माते म्हणाले.

ऑस्ट्रेलियातील द्रष्टे चित्रपट निर्माते‌ फिलिप यांनी लहानपणापासूनच आपला प्रवास सुरू केला. “बऱ्याचदा मी परिसरातील सर्कसला जवळून पाहण्यासाठी जात असे. त्या वयात, रिंगमास्टरची नोकरी माझ्यासाठी सर्वात फायदेशीर वाटली कारण त्याला सर्व काही कसे नियंत्रित करायचे हे माहित होते - प्राण्यांपासून त्याच्या चमूपर्यंत. त्यामुळे मलाही रिंगमास्टर व्हायचे होते.” नंतर, नॉयस म्हणाले की त्यांना हे समजले की त्यांना इतर कशाहीपेक्षा प्रेक्षकांकडून हास्याचा आवाज ऐकायची इच्छा आहे, ज्यामुळे अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शो व्यवसायातील करिअरचा मार्ग मोकळा झाला.

1975 मध्ये नॉयस यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले; तथापि, 1978 मध्ये त्यांनी न्यूजफ्रंट या चित्रपटाद्वारे गंभीर आणि व्यावसायिक यश मिळवले.

“तुमची पटकथा जितकी चांगली असते तितकेच तुम्ही दिग्दर्शक म्हणून चांगले असता”, लेखक हा कोणत्याही चित्रपटाचा कणा असतो यावर नॉयस यांनी भर दिला. “तुम्ही तुमच्या लेखकाशी दयाळूपणे वागले पाहिजे. एकसंध आणि ठोस पटकथा तुमच्या चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेऊ शकते. दिग्दर्शक आणि लेखक यांच्यातील नाते हा कोणत्याही चित्रपटातील महत्त्वाचा घटक असतो.

54 वर्षांच्या कारकिर्दीत, फिलिप नॉयस यांनी वैविध्यपूर्ण आणि विचारप्रवर्तक चित्रपटांच्या श्रेणीद्वारे वारसा आणि यश मिळवले आहे.

चित्रपटाच्या बजेटच्या विषयाला स्पर्श करताना नॉयस म्हणाले, “जास्त कमाई करण्यासाठी तुम्हाला छोट्या बजेटमध्ये चित्रपट बनवायला शिकावे लागेल. तुमच्या संसाधनांमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे; हे सुनिश्चित करण्याचा एक मार्ग म्हणजे बजेट आणि चमूची जोखीम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.” 

निर्मितीपूर्व प्रक्रिया, नियोजन, कथाफलक हे सर्व चित्रपट निर्मितीचे महत्त्वाचे घटक आहेत. “प्रॉडक्शन हाऊस, अभिनेते आणि चित्रपट निर्मिती प्रक्रियेत गुंतलेल्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींकडून मान्यता मिळण्यापूर्वी एखाद्याला अनेक वेळा चित्रपट बनवावा लागतो”, नॉयस यांनी सार सांगितले.

हे सत्र म्हणजे महान चित्रपट निर्मात्याच्या प्रतिभेचा पुरावा होता. कथाकथनाच्या त्यांच्या सूक्ष्म पद्धतीमुळे, त्यांनी संपूर्ण सत्रात अनेक आशादायी चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा दिली.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Nandini/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2077359) Visitor Counter : 6


Read this release in: English , Hindi , Kannada