सहकार मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन केले
2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय जगभरातील कोट्यवधी गरीब लोक आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.
पंतप्रधान मोदी यांच्या "सहकार से समृद्धी" या संकल्पनेने लाखो गावे, महिला आणि शेतकरी यांच्या समृद्धीचा मार्ग मोकळा केला आहे.
तीन वर्षांनंतर भारतातील एकही ग्रामपंचायत सहकारी संस्थेशिवाय राहणार नाही
या क्षेत्रातील मनुष्यबळाला प्रशिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल बनवण्यासाठी लवकरच एक सहकारी विद्यापीठ स्थापन केले जाईल
Posted On:
25 NOV 2024 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चा देखील प्रारंभ केला आणि एका स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, भूतानचे पंतप्रधान, फिजीचे उपपंतप्रधान, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि इतर विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले की 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय म्हणजे अगदी योग्य वेळी उचललेले पाऊल आहे आणि संयुक्त राष्ट्रांचा हा निर्णय जगभरातील कोट्यवधी गरीब लोक आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.
अमित शाह म्हणाले की तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार से समृद्धीचा नारा दिला होता ज्यामध्ये या परिषदेच्या संकल्पनेचे सार प्रतिबिंबित होत आहे आणि ज्यामुळे लक्षावधी गावे, महिला आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ते म्हणाले की, मागील 3 वर्षात भारताच्या सहकारी क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारताच्या सहकार चळवळीने पुनरुज्जीवनाचा अनुभव घेतला आहे आणि त्यासोबत एका नव्या उत्साहाचा संचार झाला आहे.
पुढील तीन वर्षात दोन लाख नव्या प्राथमिक कृषी पत संस्थांच्या (पीएसी) माध्यमातून एकही गाव असे राहणार नाही ज्यामध्ये सहकारी संस्था नसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पतसंस्थांना आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक उपाय हाती घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर स्थापन केलेल्या तीन नव्या सहकारी संस्थामुळे भारतातील शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठ देखील उपलब्ध होणार आहेत. नॅशनल को ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट्स लिमिटेड(NCEL), नॅशनल को ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड(NCOL) आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड(BBSSL) आगामी काळात केवळ शेतकऱ्यांचा जागतिक व्यापारातील सहभागच वाढवणार नाही तर एक लहान शेतकरी कशा प्रकारे जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचतो हे दाखवून जगभरातील सहकारी संस्थांना प्रेरणा देण्याचे देखील काम करेल.
अमित शाह यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सहकाराची संपूर्ण कायदेशीर चौकट बळकट झाली आहे, श्वेतक्रांती 2.0 आणि नील क्रांतीची देखील सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये सहकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सहकाराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 3 वर्षात सर्वसमावेशक बदल झाले आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही एक सहकारी विद्यापीठही उभारणार आहोत, ज्याद्वारे प्रशिक्षित आणि तंत्रज्ञान-सक्षम मनुष्यबळ निर्माण केले जाईल. "आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष" मध्ये मोदी सरकार नवीन सहकारी धोरण आणून भारताच्या सहकार चळवळीला नवीन आयाम देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सहकाराचा आवाका वाढवण्यासाठी भारत सरकार प्रत्येक गाव आणि शेतकऱ्याला सहकार चळवळीशी जोडण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही देत, नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी आणि सहकारी संस्थांची व्याप्ती वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2077197)
Visitor Counter : 5