माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी (IFFI) महोत्सवात प्रथमच ‘घर जैसा कुछ’ या लडाखी भाषेतील चित्रपटाने ‘नॉन-फीचर’ मालिकेची सुरुवात
लडाखी भाषेतील चित्रपटाने झालेली सुरुवात भारतातील प्रादेशिक चित्रपटांचे वाढते महत्व प्रतिबिंबित करते
हा चित्रपट नवीन जागेला आपलेसे करताना, गत काळात हरवून गेलेले आपले घर शोधण्याचा जगभरात दिसून येणारा संघर्ष चित्रित करतो: दिग्दर्शक हर्ष संगानी
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2024
55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज अकथित कथांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नॉन-फीचर’ चित्रपटांच्या मालिकेची सुरुवात ‘घर जैसा कुछ’ या लडाखी भाषेतील चित्रपटाने झाली. 55 व्या इफ्फी (IFFI) महोत्सवात पत्र सूचना कार्यालयाने (PIB) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कलाकार आणि क्रू सदस्यांसह माध्यमांशी संवाद साधला.
‘घर जैसा कुछ’ हा हर्ष संगानी यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट आहे. इफ्फी (IFFI) महोत्सवातील नॉन-फिक्शन श्रेणीत सुरुवातीला प्रदर्शित होणारा लडाखमधील पहिला चित्रपट म्हणून या लघुपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वारशाने मिळालेल्या आपल्या परंपरा जपत भविष्यातील आकांक्षांचा पाठपुरावा करताना एखाद्या व्यक्तीला करावा लागणारा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळतो. चित्रपटात हा संघर्ष आगळ्या पद्धतीने मांडण्यात आला असून, यामध्ये नायकाच्या पालकांचे आत्मे कथानकाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. लडाखी समुदायाची भाषा, परंपरा आणि जीवन मूल्य, याचा सुंदर पट उलगडणारे चित्रपटाचे कथानक, प्रेक्षकांवर दृश्यात्मक आणि भावनिक प्रभाव पाडणारे आहे.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना चित्रपटाचे दिग्दर्शक हर्ष संगानी म्हणाले, “माझ्या मनातल्या या कथेने आतापर्यंत कधीच मूर्त रूप घेतले नव्हते. एके काळी अस्तित्वात असलेले आपले घर शोधण्याची नायकाची धडपड मला परिचयाची वाटते, कारण मी देखील माझ्या आयुष्यात ही घालमेल अनुभवली आहे.”
नवीन उज्ज्वल भवितव्याच्या शोधात आपले गांव सोडून अनोळखी शहरांत जाणारा प्रत्येकजण केवळ आपल्या घराच्या आठवणी जपण्यासाठी करत असलेल्या संघर्षावर या चित्रपटात मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. "एकेकाळी आपल्याला आराम आणि मायेची उब देणाऱ्या घरासाठीची तळमळ प्रेक्षकांनी अनुभवावी अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही चित्रपटाचे नांव ठेवले, ‘घर जैसा कुछ' – 'घरासारखे काही’", असे चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले.
पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले चित्रपटाचे प्रमुख छायाचित्रकार कबीर नाइक म्हणाले की छायाचित्रकार म्हणून लडाखसारख्या ठिकाणी चित्रीकरण करणे हे माझे स्वप्न होते. मात्र अशा निसर्गसुंदर ठिकाणी छायाचित्रण करताना चित्रपटातली व्यक्तीरेखा ठळकपणे उठून दिसेल अशाप्रकारे छायाचित्रण करण्यासाठी आणखी कठीण परिश्रम करावे लागतात.
चित्रपटाला लडाखसह देशाच्या अन्य भागांमधूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करताना दिग्दर्शक म्हणाले, इफ्फीमध्ये निवडीसाठी पाठवण्याआधी काही दिवसच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले गेले. अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांना दाखविला गेलेला नाही, तरीही या चित्रपटातल्या कथेशी नातं असलेले व त्यातील भावना जाणणारे प्रेक्षक या चित्रपटाला मिळतील अशी आशा आहे.
55 व्या इफ्फी महोत्सवातील लघुपटांच्या श्रेणीसाठी नांवनोंदणी केलेल्या 262 प्रवेशिकांमधून चित्रपट क्षेत्रातल्या देशभरातल्या नामवंतांनी निवड समितीतून 20 चित्रपटांची निवड केली आहे.
इफ्फीमधील ही श्रेणी माहितीपट व लघुपटांच्या माध्यमातून आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख तसेच प्रस्थापित चित्रपटकर्त्यांना समर्पित आहे.
या चित्रपटाच्या महोत्सवातील समावेशातून प्रादेशिक भाषांमधील विशेषतः लडाखसारख्या लोकांना फारशा माहिती नसलेल्या भागातील चित्रपटांचा भारतातला वाढता प्रभाव दिसून येतो.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajashree/Surekha/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075884)
Visitor Counter : 32