पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गयानाच्या राष्ट्राध्यक्षांशी अधिकृत चर्चा केली

Posted On: 22 NOV 2024 12:22AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाऊनमधील सरकारी निवासात गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान आली यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी सरकारी निवासात आल्यानंतर  राष्ट्राध्यक्ष आली यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या सन्मानार्थ औपचारिक मानवंदन सोहोळा आयोजित केला.
दोन्ही नेत्यांनी एका छोट्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा झाली.भारत आणि गयाना यांच्यातील दृढ संबंधांना अधोरेखित करत, पंतप्रधानांनी सांगितले की त्यांची ही भेट द्विपक्षीय संबंधांना सशक्त चालना देईल. दोन्ही नेत्यांनी यावेळी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्मिती, पारंपरिक औषधोपचार, अन्न सुरक्षा, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल सार्वजनिक आरोग्यसुविधा, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह भारत आणि गयाना यांच्यातील बहुआयामी संबंधांच्या विविध पैलूंविषयी तपशीलवार चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान सध्या असलेल्या उर्जा क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेताना, हायड्रोकार्बन्स तसेच नवीकरणीय उर्जा क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी प्रचंड वाव आहे असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. विकासविषयक सहकार्य हा भारत-गयाना भागीदारीतील महत्त्वाचा स्तंभ  असल्याचे त्यांनी नमूद केले. गयानाच्या विकासविषयक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत सातत्याने पाठिबा पुरवत राहील अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
दोन्ही नेत्यांनी यावेळी परस्पर स्वारस्याच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांबाबत देखील विचारांची देवाणघेवाण केली. भारताच्या यजमानपदात आयोजित व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष आली यांचे आभार मानले. जगाच्या दक्षिणेकडील देशांमध्ये ऐक्य बळकट करण्यासाठी एकत्र एम काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.
दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी नियमितपणे उच्च स्तरीय बैठकांचे आयोजन करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीदरम्यान दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्या करारांचे तपशील मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2075837) Visitor Counter : 13