कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जागतिक मृदा परिषद 2024 ला केले संबोधित
विद्यार्थिनी, संशोधकांनी स्थानिक आणि जागतिक स्तरावरील मृदा आव्हानांना तोंड देणारे नवोन्मेष विकसित करण्यात आघाडीची भूमिका बजावावी : चौहान
मातीची धूप ही केवळ राष्ट्रीय समस्या नसून जागतिक चिंतेची बाब आहेः चौहान
Posted On:
19 NOV 2024 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2024
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील पूसा येथे आयोजित जागतिक मृदा परिषद 2024 ला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले.
मातीचा कस बिघडला तर पृथ्वीवरील सजीवही निरोगी राहू शकत नाहीत. आपण एकमेकांना पूरक आहोत, म्हणूनच मातीची निगा राखली जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे असे चौहान यांनी यावेळी सांगितले. आज संपूर्ण जग मातीचा कस याबाबत चिंता करत आहे, असे ते म्हणाले.
रासायनिक खतांचा वाढता वापर आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व, नैसर्गिक साधनसंपत्तीचे बेसुमार शोषण आणि अस्थिर हवामान याचा जमिनीवर परिणाम होत असल्याचेही चौहान म्हणाले. आज भारतीय भूमीची माती कसविषयक मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अनेक अभ्यासानुसार आपली 30 टक्के माती खराब झाली आहे, असे त्यांनी सांगितले. मातीची धूप, क्षारता, प्रदूषण यामुळे जमिनीतील आवश्यक नायट्रोजन आणि सूक्ष्म पोषक घटकांची पातळी कमी होत आहे, तसेच सेंद्रिय कार्बनच्या कमतरतेमुळे जमिनीची सुपीकता आणि लवचिकता कमी झाली आहे, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या आव्हानांचा केवळ उत्पादनावरच परिणाम होत नाही तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी उपजीविका आणि अन्न संकटही निर्माण होईल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. आपल्या सरकारने मृदा संवर्धनासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
युद्धपातळीवर वैज्ञानिक नवोन्मेषांचे उपाय आणि विस्तार प्रणालीची भूमिका महत्त्वाची आहे, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थांच्या सहकार्याने भारतातील कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांना ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी होणे आवश्यक आहे, हे मंत्र्यांनी अधोरेखित केले. शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती वेळेवर पोहोचावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कृषी विज्ञान केंद्रही या दिशेने अनेक प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी हे मातीचे सर्वात मोठे रक्षक आहेत आणि आपण त्यांना शिक्षण, प्रोत्साहन आणि आधुनिक वैज्ञानिक माहितीच्या माध्यमातून सक्षम बनवायचे आहे, असेही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले. महिला विद्यार्थिनी आणि संशोधकांनी स्थानिक आणि जागतिक स्तरावरील मृदा आव्हानांना सामोरे जाणाऱ्या नवोन्मेषाचा विकास करण्यात प्रमुख भूमिका बजावली पाहिजे, असेही ते म्हणाले. मातीची धूप ही केवळ राष्ट्रीय समस्या नाही तर जागतिक चिंतेची बाब असून संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्यांचा एक भाग देखील आहे, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/Darshana
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2074714)
Visitor Counter : 17