युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
19-22 नोव्हेंबर 2024 दरम्यान भारत नवी दिल्लीत WADA च्या जागतिक अध्ययन आणि विकास आराखड्याची परिणाम व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घेणार
Posted On:
18 NOV 2024 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2024
WADA अर्थात जागतिक डोपिंग प्रतिबंधक संस्थेच्या सहयोगाने नवी दिल्लीत येत्या 19-22 नोव्हेंबर या काळात GLDF ची म्हणजेच जागतिक अध्ययन आणि विकास आराखड्याची परिणाम व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यासाठी भारताची तयारी पूर्ण होत आली आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये अंमली पदार्थांचा वापर करण्यावर प्रतिबंध घालणारी राष्ट्रीय संस्था- NADA अर्थात राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक संस्था, WADA च्या सहयोगाने हे आयोजन करत असून, जपान स्पोर्ट्स एजन्सी आणि जपान डोपिंग प्रतिबंधक संस्था यांचे या आयोजनास पाठबळ आहे. जागतिक पातळीवर डोपिंगला प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याची भारताची वचनबद्धताच या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून अधोरेखित होत आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम चार दिवसांचा असून यात दहापेक्षा अधिक देशांतील डोपिंग-प्रतिबंध क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञांचा यात सहभाग असेल. या देशांमध्ये- मालदीव, नेपाळ, मलेशिया, थायलंड, उझबेकिस्तान, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, किरगिझस्तान आणि लाओस या देशांचा समावेश आहे. तसेच WADA, ऍथलेटिक्स इंटेग्रिटी युनिट (AIU), आणि जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) - अशा आंतरराष्ट्रीय संस्था/संघटनांचे प्रतिनिधीही या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी असतील.
GLDF प्रशिक्षण म्हणजे WADA च्या क्षमता बांधणी आराखड्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. डोपिंग-प्रतिबंध करणाऱ्या व्यक्तींचे तांत्रिक कौशल्य विविध कार्यविषयांत उंचावणे हा याचा उद्देश असून, दिल्लीतील सदर प्रशिक्षण, विशेषतः परिणाम व्यवस्थापनाशी निगडित आहे.
या कार्यक्रमादरम्यान काही कळीच्या मुद्द्यांवर प्रशिक्षण सत्रे घेतली जातील- जसे की- विशिष्ट प्रकरणाचे व्यवस्थापन, न्यायनिवाड्याची प्रक्रिया, आणि जागतिक डोपिंग-प्रतिबंधक संहिता तसेच आंतरराष्ट्रीय मानके लागू करणे इत्यादी. डोपिंग-प्रतिबंधाचा प्रक्रियांचे प्रमाणीकरण करणे देशादेशांदरम्यान सहयोग वाढवणे, आणि जागतिक पातळीवरील क्रीडानिष्ठ आराखडा बळकट करणे- अशा उद्दिष्टांनी असे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात.
अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे यजमानपद भारत भूषवत असल्याने, क्रीडाक्षेत्रातील प्रामाणिकतेचा पुरस्कार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या सहयोगाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने भारताचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असल्याचेच अधोरेखित होते. सध्या क्रीडाक्षेत्रात न्यायपूर्ण आणि डोपिंग-मुक्त वातावरण राखण्याच्या दृष्टीने आह्वानात्मक स्थिती सतत निर्माण होत आहे. असे असताना, विविध क्षेत्रांतील WADA GLDF प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी तसेच सहभागी देशांतील डोपिंग-प्रतिबंधक व्यावसायिकांच्या क्षमता-बांधणीसाठी महत्त्वाच्या संधी निर्माण होत आहेत.
* * *
S.Tupe/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2074208)
Visitor Counter : 25