ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या दरात महिनाभऱात 22 टक्क्यांहून अधिक घसरण ; ग्राहक व्यवहार विभागाची माहिती

Posted On: 17 NOV 2024 12:16PM by PIB Mumbai

 

मंडईतील दर कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ दरात घसरण झाली आहे. देशामध्ये 14 नोव्हेंबर रोजी टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 52.35 रुपये होती. एका महिन्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी हा दर प्रति किलो 67.50 रुपये होता. त्या तुलनेत हे दर 22.4% ने कमी झाले आहेत. याच कालावधीत, आझादपूर मंडईतील सरासरी  दर निम्म्याने म्हणजे सुमारे 50% घसरून  प्रति क्विंटल 5883 रुपयांवरून 2969रुपयांपर्यंत खाली आले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्याने हे दर कमी झाले आहेत.

कृषी विभागाच्या तिसऱ्या सुधारित अंदाजानुसार 2023-34 या वर्षात टोमॅटोचे एकूण वार्षिक उत्पादन 213.20 लाख टन इतके होते. हे उत्पादन 2022-23 च्या 204.25 लाख टनांच्या तुलनेत 4% जास्त आहे. टोमॅटोचे उत्पादन वर्षभर सुरू असले तरी याचे उत्पादन करणाऱ्या भागांमध्ये हंगामनिहाय उत्पादनात बदल होतात, ज्यामुळे उत्पादनाच्या प्रमाणात चढ-उतार होतो. प्रतिकूल हवामान परिस्थिती तसेच वाहतुकीतील किरकोळ अडचणी यांचा संवेदनशील आणि लवकर खराब होणाऱ्या टोमॅटो पिकाच्या दरांवर मोठा परिणाम होतो.

गेल्या महिन्यात टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसामुळे झाली होती.

देशाच्या विविध भागांमधील टोमॅटो उत्पादनाच्या हंगामी स्वरूपामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये मुख्य पेरणीचे कालावधी आहेत. मडणपल्ले आणि कोलार यांसारख्या प्रमुख  टोमॅटो केंद्रांवरील याची आवक कमी झाली असली  तरी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या राज्यांतील छोट्या भागांतून हंगामी आवक झाल्यामुळे देशभरात याच्या पुरवठ्यातील तूट भरून निघाली आहे आणि दर कमी झाले आहेत.

***

S.Kane/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2074069) Visitor Counter : 34