वस्त्रोद्योग मंत्रालय
"तांत्रिक वस्त्रोद्योग भारताचा आर्थिक कणा बनेल" - गिरीराज सिंह"
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2024 5:00PM by PIB Mumbai

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (आयआयटीएफ) मधील विशेष हातमाग व हस्तकला प्रदर्शन आणि विक्रीसाठीच्या वस्त्र मंडपाचे उद्घाटन केले. त्यांच्या समवेत वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा देखील उपस्थित होते. गिरीराज सिंह आणि पबित्रा मार्गेरिटा यांनी मंडपातील विविध दालनांना भेट दिली तसेच हातमाग विणकर आणि कारागिरांशी संवाद साधला.
आयआयटीएफ च्या 43व्या सत्रात बोलताना गिरीराज सिंह यांनी तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या महत्त्वावर भर दिला आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात भारत कशा प्रकारे पुढे जात आहे यावर चर्चा केली. तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात 12 उपक्षेत्रे आहेत असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या निर्यातीवर अधिक भर दिला जात असून भविष्यात तांत्रिक वस्त्रोद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरतील, असे त्यांनी सांगितले. बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचा विषय ‘जनजाती समुदाय’ यावर आधारित ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

विणकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक चांगल्या उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार वस्त्र मूल्य साखळी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. भारत हा जगातील सर्वांत मोठा हातमाग समुदाय असलेला देश आहे. भारतात आपण शाश्वतता आणि ऊर्जेची परिपूर्ण क्षमता यावर लक्ष केंद्रित करतो. जग शाश्वत उत्पादनांच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हातमाग उद्योग शून्य कार्बन फूटप्रिंट्स निर्माण करतो तसेच कोणतीही ऊर्जा वापरत नाही. शिवाय हातमाग उद्योगाला पाणी फूटप्रिंट्सही नाही, असेही त्यांनी नमूद केले.

भारत मंडपम येथे आयोजित विशेष हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण:

- 206 दालने (27 राज्यांतील हातमाग आणि हस्तकला)
- 100 हातमाग (22 राज्यांतील प्रतिनिधित्व)
- 100 हस्तकला (27 राज्यांतील प्रतिनिधित्व)
- संकल्पनांवर आधारित 6 मंडप (संकल्पना - भारतीय वस्त्रांचा जनजातीतील खजिना)
- 8 प्रत्यक्ष हातमाग, कला/हस्तकला प्रात्यक्षिके (उदा. कानी शाल - जम्मू आणि काश्मीर, तांगालिया/कच्छी शाल - गुजरात, कुल्लू/किन्नौरी शाल - हिमाचल प्रदेश, लोन लूम - मणिपूर आणि नागालँड, हॉर्न व बोन क्राफ्ट - उत्तर प्रदेश, भागलपुरी सिल्क - बिहार, बाघ प्रिंट - ओडिशा)
- किरकोळ विक्रेते/ब्रँड्स आणि हातमाग विणकरांमध्ये व्यवसाय ते व्यवसाय संवाद सत्र.
- जीआय टॅग केलेल्या हातमाग व हस्तकलांवर कार्यशाळा (डॉ. रजनी), शाश्वतता/परिपत्रकता/पुनर्वापर यावर चर्चा शो (प्रत्युष कुमार).

हे प्रदर्शन 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 7.30 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले असेल.

***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2073948)
आगंतुक पटल : 75