आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारत मंडपम येथे आयोजित 43 व्या आयआयटीएफ मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने उभारलेल्या दालनाचे उद्या 14 नोव्हेंबर 2024 रोजी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य विषयाशी संबंधित) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या हस्ते उद्घाटन
या वर्षीच्या आरोग्य दालनातील सादरीकरणे मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि परिसंस्था यांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधांवर अधिक भर देणाऱ्या ‘वन हेल्थ’ या संकल्पनेभोवती गुंफण्यात आली आहेत
Posted On:
13 NOV 2024 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2024
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 43 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये (आयआयटीएफ) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने उभारलेल्या दालनाचे उद्या 14 नोव्हेंबर 2024 रोजी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य विषयाशी संबंधित) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि परिसंस्था यांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधांवर अधिक भर देणाऱ्या ‘वन हेल्थ’ नामक सर्वसमावेशक दृष्टीकोन असलेल्या संकल्पनेभोवती या वर्षीच्या आरोग्य दालनातील सादरीकरणे गुंफण्यात आली आहेत. यातील प्रत्येक घटकाचे परस्परांवरील अवलंबित्व समजून घेऊन ‘वन हेल्थ’ ही संकल्पना विविध क्षेत्रे, शाखा आणि समुदायांना स्वास्थ्याला चालना देण्यासाठी तसेच आरोग्य आणि पर्यावरणीय आव्हानांचा परिणामकारकरीत्या सामना करण्यासाठी प्रेरित करते.
आरोग्यविषयक दालनाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- मंत्रालयाच्या 19 कार्यक्रम विभागांना मिळालेल्या यशाचे प्रदर्शन: मंत्रालयाने आरोग्यसेवा क्षेत्रात केलेल्या प्रमुख कामगिऱ्या या दालनातील 39 माहितीपूर्ण स्टॉल्सच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केल्या जाणार असून त्यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी मंत्रालयाने आयोजित केलेले कार्यक्रम तसेच उपक्रम यांवर अधिक भर दिला जाईल.
- आंतरसंवादात्मक चाचण्या आणि इंस्टॉलेशन्स: आरोग्य दालनाला भेट देणाऱ्यांना एचआयव्ही, मधुमेह, हायपरटेन्शन आणि इतर असंसर्गजन्य (एनसीडीज) यांसारख्या आजारांच्या शक्यतेसाठीच्या चाचण्या तसेच समुपदेशन सत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या दालनामध्ये भीष्म क्यूब, स्वदेशी फिरती रुग्णालये यांसारख्या उपक्रमांची इंस्टॉलेशन्स उभारलेली असून ती वास्तव जगातील नेपथ्याचा वापर करून त्यांची रचना आणि वापराबाबत माहिती देणारी असतील.
- गुंगवून टाकणारे उपक्रम आणि सादरीकरणे: सदर दालनाची रचना केवळ शैक्षणिक किंवा ज्ञान देणारे स्थळ अशी न करता सर्व वयाच्या अभ्यागतांना गुंतवून ठेवणारी देखील असेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे. दररोज होणारी पथनाट्ये, विविध स्पर्धा आणि खेळ, आरोग्याशी संबंधित अत्यावश्यक संदेश देतानाच, प्रेक्षकांचे मन गुंतवून ठेवतील. विशेष लक्ष देऊन रचण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या विभागात मौजमजेला शिकण्याशी जोडणारे आभासी वास्तवाचे खेळ असतील. हे खेळ खेळताना लहान मुलांना खेळकर, संवादात्मक वातावरणात आरोग्याशी संबंधित बाबींची माहिती घेता येईल.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2073039)
Visitor Counter : 31