ऊर्जा मंत्रालय
एनएचपीसी आणि एनटीपीसी’च्या 50 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी केले संबोधित
केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी ऊर्जा विभागाचे सचिव पंकज अग्रवाल, एनएचपीसी’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. चौधरी आणि एनटीपीसी’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले
Posted On:
09 NOV 2024 7:45PM by PIB Mumbai
एनएचपीसी ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी तर एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा उपयोगिता संस्था, यांनी 9 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश केला. 7 नोव्हेंबर 1975 रोजी स्थापन करण्यात आलेल्या या दोन्ही संस्थांसाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.
केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऊर्जा विभागाचे सचिव पंकज अग्रवाल या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर.के. चौधरी आणि एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी आपल्या भाषणात दोन्ही संस्थांचे हार्दिक अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक प्रसंगाचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय ऊर्जा क्षेत्रात एनएचपीसी आणि एनटीपीसीने गेल्या पाच दशकांमध्ये दिलेले अतुलनीय योगदान आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. स्थिर आणि अखंड वीज पुरवठा देण्यासाठी त्यांचे समर्पण आणि वचनबद्धता देशाच्या शाश्वत विकासात महत्त्वपूर्ण ठरली आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी या कार्यक्रमात एनएचपीसीचे कॉमिक बुक, "जल से ज्योती" आणि एनटीपीसीचे कॉफी टेबल बुक "समत्वम्" या दोन विशेष पुस्तकांचे प्रकाशन केले. मुलांना जलविद्युत निर्मितीचे महत्त्व आणि प्रक्रियेबद्दल आकर्षक कथाकथन आणि जीवंत चित्रांद्वारे शिक्षित करणे हे "जल से ज्योती" या एनएचपीसीच्या कॉमिक बुकचे उद्दिष्ट आहे. तर एनटीपीसीचे कॉफी टेबल बुक, "समत्वम्" हे विस्मयकारक दृश्य आणि प्रेरणादायी कथांद्वारे एनटीपीसीच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करते. "समत्वम्" हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ समता आणि समतोल असा आहे. या पुस्तकात गेल्या 50 वर्षांतील एनटीपीसीचे तत्वज्ञान अंतर्भूत आहे. या पुस्तकात एनटीपीसीच्या पहिल्या औष्णिक उर्जा प्रकल्पापासून भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक उर्जा केंद्र बनण्यापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकात ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय शाश्वतता, नवोन्मेष, समुदाय सशक्तीकरण आणि जैवविविधता यामधील एनटीपीसीचे योगदानही दर्शविले आहे.
प्रख्यात पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. त्यांच्या मनमोहक सुरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि या सोहळ्याची रंगत वाढवली.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2072108)
Visitor Counter : 29