आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या 45 व्या बैठकीत पर्यटन हंगामात पर्यटन स्थळांवरच्या अन्न सुरक्षेवर अधिक लक्ष पुरवण्यावर भर
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या गोदामांवर अधिक लक्ष ठेवण्याचे तसेच डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी एसओपी जारी करण्याचे निर्देश
Posted On:
08 NOV 2024 11:48AM by PIB Mumbai
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या केंद्रीय सल्लागार समितीची आज नवी दिल्लीत 45 वी बैठक आज झाली,ज्यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तेथील लोकप्रिय पर्यटन स्थळांवर नोव्हेंबर ते मार्च दरम्यानच्या पर्यटन हंगामात बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे; जेणेकरून उच्च खाद्य उच्च सुरक्षा मानके सुनिश्चित केली जातील.
या हंगामात लोकप्रिय स्थळांवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना या पर्यटन स्थळांवर फूड सेफ्टी ऑन व्हील्स या मोबाईल खाद्यान्न प्रयोगशाळांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव,यांनी विविध राज्यांच्या अन्न आयुक्तांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोदामांवर आणि इतर सुविधांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.त्यांनी अशा गोदामांसाठी तसेच या प्लॅटफॉर्मच्या वितरण कर्मचाऱ्यांसाठी मानक संचालन प्रणाली (एसओपी) जारी करण्यास सांगितले.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यासाठी अशाप्रकारे अन्नाच्या नमुन्याच्या चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आणि या उद्देशाने अधिक प्रमाणात फूड सेफ्टी ऑन व्हील्स मोबाइल व्हॅन्स तैनात करण्यासही सांगण्यात आले.
सर्व नागरिकांकरीता अन्न सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) अंतर्गत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये खाद्यान्न संचालकांना प्रशिक्षण देण्यावर समितीने भर दिला. मार्च 2026 पर्यंत 25 लाख खाद्यान्न हाताळणाऱ्यांना (फूड हँडलर्स) प्रशिक्षण देण्याचे आवाहन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आले, आहे ज्यात विद्यापीठ, महाविद्यालय आणि वसतिगृहातील कॅन्टीन उपाहारगृहांचाही समावेश आहे.
यावेळी एकात्मिक अन्न सुरक्षा दृष्टिकोनाच्या गरजेवरही भर देण्यात आला, तसेच सर्व संबंधित मंत्रालये, भागधारकांना सहयोगाचे आवाहन केले आणि राज्य आणि जिल्हा स्तरावर सल्लागार समितीच्या बैठका नियमितपणे आयोजित करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहित करण्यात आले.
इट राइट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून पौष्टिक आहार संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सक्रियपणे सहभागी करण्याचे महत्त्व या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. राज्यांना मेळावे, वॉकेथॉन्स आणि पथनाट्य (नुक्कड नाटक) यांसारख्या लोकप्रसार उपक्रमांद्वारे अन्न सुरक्षा जागरूकता वाढविण्याचा सल्ला देण्यात आला.
अन्न सुरक्षा आयुक्त, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्न उद्योग, ग्राहक गट, कृषी क्षेत्र, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था यांच्या सदस्यांसह साठहून अधिक अधिकाऱ्यांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071820)
Visitor Counter : 29