राष्ट्रपती कार्यालय
गोव्यात ‘डे ॲट सी’कार्यक्रमाला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
07 NOV 2024 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (7 नोव्हेंबर, 2024) गोव्यातील ‘डे ॲट सी’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. आयएनएस विक्रांतवरील 'डे ॲट सी' दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत मिग 29K उड्डाण आणि उतरवणे , युद्धनौकेतून क्षेपणास्त्र गोळीबार आणि पाणबुडी मोहीमसह अनेक नौदल मोहिमा पार पडल्या. यावेळी त्यांना भारतीय नौदलाची भूमिका आणि कायदा तसेच मोहिमांच्या संकल्पनेबद्दल माहिती देण्यात आली.आयएनएस विक्रांतच्या खलाशांशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी ताफ्याला संबोधित केले जे समुद्रातील सर्व युनिट्सना प्रसारित करण्यात आले. आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचा अनेक हजार वर्षांचा समृद्ध सागरी इतिहास आहे. त्याला अनुकूल सागरी भौगोलिक स्थिती देखील लाभली आहे. 7500 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीसह, भारताचा सागरी भौगोलिक स्थिती आर्थिक विकास , प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि धोरणात्मक प्रभावासाठी अनेक संधी उपलब्ध करते . आपल्याकडे प्रचंड सागरी क्षमता आहे ज्याचा आपण विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासात उपयोग करून घ्यायला हवा.
राष्ट्रपती म्हणाल्या की, जागतिक भू-राजकीय आणि सुरक्षितता वातावरणात, विशेषत: सागरी क्षेत्रामध्ये चालू असलेल्या उलथापालथीमुळे आपण या प्रदेशात आणि त्यापलीकडे आपल्या राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण आणि पाठपुरावा करण्यासाठी आपले नौदलाचे सामर्थ्य अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. भारतीय नौदलाची सज्जता आणि दृढ वचनबद्धतेमुळेच भारताने हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित केले आहे. आयएनएस विक्रांतची तैनाती आणि परिचालन , भारताची अणुशक्तीवर चालणारी दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाटचे जलावतरण आणि प्रगत आघाडीच्या युद्धनौका आणि अत्याधुनिक नौदल पायाभूत सुविधांची जोड यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्याला मोठी चालना मिळाली आहे. या कामगिरीमुळे भारताकडे एक मजबूत प्रादेशिक शक्ती म्हणून पाहिले जात आहे असे त्यांनी नमूद केले.
सर्व पदांवर आणि भूमिकांमध्ये महिलांच्या समावेशाच्या पलीकडे जाऊन भारतीय नौदलाने आपल्या महिला सागरी योद्धांच्या संपूर्ण लढाऊ क्षमतेचा लाभ उठवण्यासाठी सक्रिय उपाययोजना हाती घेतल्या आहेत याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. भारतीय नौदलाने युद्धनौकेवर आपल्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती केली आहे. तसेच महिला नौदलाच्या विमानांचे सारथ्य करतील असा निर्णय देखील घेण्यात आला आहे. अलीकडेच भारतीय नौदलाला पहिली महिला हेलिकॉप्टर वैमानिक देखील मिळाली आहे. लिंग समावेशकतेला प्रोत्साहन देण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये या उपलब्धी महत्त्वपूर्ण असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071643)
Visitor Counter : 30