माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 2024 : ‘वर्क-इन-प्रोग्रेस लॅब’मध्ये सहा चित्रपट दाखवण्यात येणार
इफ्फी मधील ‘वर्क-इन-प्रोग्रेस लॅब’ मध्ये नवोदित चित्रपट निर्मात्यांना मार्गदर्शन केले जाणार
#IFFIWood, 7 नोव्हेंबर 2024
फिल्म बझार ने या वर्षी इफ्फीमधील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी अधिकृत निवड झालेल्या सहा आगळ्यावेगळ्या काल्पनिक चित्रपटांची घोषणा केली आहे.
निवडण्यात आलेले चित्रपट आहेत:
1.शेप ऑफ मोमोज -ट्राइबेनी राय (नेपाळी)
2.गांगशालिक (गांगशालिक - रिव्हर बर्ड ) शक्तीधर बीर (बंगाली)
3.येरा मंदारम (द रेड हिबिस्कस) मोहन कुमार वालासाला (तेलुगु)
4.कट्टी री राती (हंटर्स मून ) रिधम जानवे (गड्डी, नेपाळी)
5.उमल- सिद्धार्थ बादी (मराठी)
6.द गुड, द बॅड, द हंग्री - विवेक कुमार (हिंदी)
दीर्घ वापराने सिद्ध झालेल्या मॉडेलचे अनुसरण करून, लॅब या वर्षी देखील ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सत्रे आयोजित करणार आहे. सहभागाच्या विविध पद्धतींचे हे मिश्रण चित्रपट निर्माते आणि मार्गदर्शकांना वास्तविक वेळेत विचारमंथन करण्यास आणि निर्मिती पश्चात सहाय्य मिळविण्याचे मार्ग शोधण्यात मदत करते.
या सहा चित्रपटांपैकी पाच चित्रपट हे तरुण आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांचे पदार्पणातील चित्रपट आहेत. हे चित्रपट केवळ वैविध्यपूर्ण कथांचे वैभव दर्शवत नाहीत तर सांस्कृतिक दृष्टीकोनांची घट्ट वीण देखील प्रतिबिंबित करतात. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) जो या महिन्यात 55 व्या वर्षात पाऊल टाकत आहे आणि युवा चित्रपट निर्मात्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यांचे कथाकथनाची अभिनव मांडणी आणि नवीन दृष्टीकोन अधोरेखित करत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.
वर्क इन प्रोग्रेस (डब्ल्यूआयपी) हा उपक्रम सर्जनशीलतेला चालना देण्याविषयी इफ्फीची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो आणि कलाकारांच्या नवीन पिढीच्या नजरेतून समकालीन जीवनातील गुंतागुंत प्रतिबिंबित करत प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या कथा ठळकपणे मांडतो. सिनेमासाठी हा एक अद्भुत काळ आहे आणि या उदयोन्मुख कलाकृतींचे यश साजरे करण्यात फिल्म बझार आघाडीवर आहे!
वर्क इन प्रोग्रेस लॅब बद्दल
वर्क-इन-प्रोग्रेस लॅब ही काल्पनिक चित्रपटांसाठी समर्पित असून चित्रपटगृहांमध्ये ते प्रदर्शित करणे हा उद्देश आहे आणि दरवर्षी जास्तीत जास्त सहा चित्रपट निवडले जातात. निवडलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि संकलकांना दिग्गज मार्गदर्शकांच्या पॅनेलसमोर त्यांचे रफ कट्स दाखवण्याची अनोखी संधी मिळेल, त्यांच्या अनमोल प्रतिक्रिया मिळतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संकलक निवडक चित्रपट निर्मात्यांना संकलन संबंधी सत्रांद्वारे मार्गदर्शन करतील, त्यांचे कलागुण विस्तारतील आणि त्यांचा दृष्टीकोन सुधारेल. मार्गदर्शकांमध्ये विविध प्रकारच्या उद्योग व्यावसायिकांचा समावेश आहे, ज्यामध्ये चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक, समीक्षक, निर्माते आणि अनुभवी संकलक आहेत, जे सर्व चित्रपट निर्मात्यांना उत्कृष्ट अंतिम कलाकृती सादर करण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
2008 मध्ये स्थापनेपासून , वर्क-इन-प्रोग्रेस लॅबने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणाऱ्या चित्रपटांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. भूतकाळातील उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये पुतुल नाचेर इतिकथा (डब्ल्यूआयपी लॅब 2023), शिवम्मा (डब्ल्यूआयपी लॅब 2021, बुसान 2022 विजेता), एक जगह अपनी (डब्ल्यूआयपी लॅब 2021), पवई (डब्ल्यूआयपी लॅब 2020), पाक (रक्ताची नदी) (डब्ल्यूआयपी लॅब 2020) , पेड्रो (डब्ल्यूआयपी लॅब 2019), शंकर्स फेरीज (डब्ल्यूआयपी लॅब 2019), लैला और सत् गीत (मेंढपाळ आणि सात गाणी) (डब्ल्यूआयपी लॅब 2019), फायर इन द माउंटन्स (डब्ल्यूआयपी लॅब 2019), ईब अल्ले ओ! (डब्ल्यूआयपी लॅब 2018), सोनी (डब्ल्यूआयपी लॅब 2017), द गोल्ड-लॅडन शीप अँड द सेक्रेड माउंटन (डब्ल्यूआयपी लॅब 2016), लिपस्टिक अंडर माय बुरखा (डब्ल्यूआयपी लॅब 2015), थिथी (डब्ल्यूआयपी लॅब 2014), तितली (डब्ल्यूआयपी लॅब 2013) ), किल्ला (डब्ल्यूआयपी लॅब 2013), तुंबड (डब्ल्यूआयपी 2012), मिस लव्हली (डब्ल्यूआयपी लॅब 2011) आणि शिप ऑफ थिसस (डब्ल्यूआयपी लॅब 2011) यांचा समावेश आहे.
फिल्म बझार बद्दल
फिल्म बझार हा एक B2B प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश दक्षिण आशियाई चित्रपटांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन देणे आहे. फिल्म बझार मधील व्ह्यूइंग रूम हे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाची वैयक्तिकरित्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जागतिक विक्री एजंट्स आणि खरेदीदारांमध्ये जाहिरात करण्यासाठी प्रदान केलेले सशुल्क व्यासपीठ आहे.
फिल्म बझार संबंधी अधिक माहितीसाठी, कृपया खालील लिंक पहा:
https://filmbazaarindia.com/the-bazaar/about-film-bazaar/
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2068120
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2071092
अधिक माहितीसाठी, कृपया films@filmbazaarindia.com वर फिल्म बझार टीमशी संपर्क साधा.
PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071493)
Visitor Counter : 103