पर्यटन मंत्रालय
लंडन इथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान जागतिक पर्यटन बाजार (WTM) मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा सहभाग
Posted On:
05 NOV 2024 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2024
लंडन मधील ‘एक्सेल लंडन’ इथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात (WTM) भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सहभागी होत आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय मूळ असलेले 19 लाख नागरिक आहेत. पर्यटन मंत्रालयाने या पर्यटन बाजारासाठी 50 जणांचे पथक पाठवले असून त्या पथकात राज्य सरकारांचे, पर्यटन संस्थांचे, विमानकंपन्यांचे, हॉटेल मालकांचे प्रतिनिधी समाविष्ट असून भारताची सांस्कृतिक विविधता, पर्यटनाचे अनेक प्रकार व थक्क करून टाकणारे एकमेवाद्वितीय अनुभवांचे भांडार या जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची जबाबदारी त्या पथकावर आहे. जागतिक स्तरावर एक दर्जेदार पर्यटन अनुभव देणारा देश म्हणून भारताचे स्थान बळकट करणे व त्यायोगे भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. WTM 2024 मधील इंडिया पॅव्हिलिअन मध्ये भारताची समृद्ध व विविधरंगी सांस्कृतिक परंपरा व भाषावैविध्य प्रदर्शित केले जाईल, ज्यातून आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटन, विवाहसमारंभ किंवा साहस पर्यटन, पर्यावरण व खाद्यपर्यटन, इत्यादी विविधरंगी अनुभव देणाऱ्या पर्यटनाची माहिती सादर केली जाईल. यावर्षी इंडिया पॅव्हिलिअनचा प्रमुख भर विवाह पर्यटन, MICE पर्यटन व महाकुंभ मेळा यावर राहणार आहे. भारतीय विवाहसोहळ्याची झलक दाखवणारा एक मंडपही इंडिया पॅव्हिलिअनमध्ये उभारण्यात आला आहे.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाखेरीज अनेक राज्य पर्यटन विभाग, पर्यटन व्यवस्थापन संस्था, विमान कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यादेखील या WTM 2024 मधील इंडिया पॅव्हिलिअनमध्ये सहभागी होणार आहेत.
S.Kane/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070918)
Visitor Counter : 36