संरक्षण मंत्रालय
भारत-अमेरिकेच्या संयुक्त विशेष सैन्य दलाच्या ‘वज्र प्रहार’ सरावासाठी भारतीय सैन्य दल रवाना
Posted On:
01 NOV 2024 2:40PM by PIB Mumbai
भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या 15 व्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज रवाना झाले. हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे. याच सरावाची यापूर्वीची आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये मेघालयातील उमरोई येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यानचा हा या वर्षातील दुसरा सराव असेल. या आधीचा ‘युद्ध अभ्यास 2024’ हा सराव सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थानात आयोजित करण्यात आला होता.
संयुक्त सरावात भाग घेणाऱ्या दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 45 जवान असतील. भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व स्पेशल फोर्स युनिट्स आणि अमेरिकेच्या तुकडीचे प्रतिनिधित्व ग्रीन बेरेट्स करतील.
परस्पर सहकार्याने केले जाणारे कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणे हे वज्र प्रहार या सरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावामुळे वाळवंटीआणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाच्या मोहीमा राबविण्याची एकत्रित क्षमता वाढेल. उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल.
सरावादरम्यान केल्या जाणाऱ्या अभ्यासाच्या तालीम किंवा पैलूंमध्ये संयुक्त दल मोहिमेचे नियोजन, शोध मोहीम, मानवरहित एरियल सिस्टमचा अवलंब, विशेष मोहिमा राबवणे, जॉइंट टर्मिनल अटॅक कंट्रोलरच्या कृती आणि विशेष मोहीमांमध्ये मानसशास्त्रीय युद्ध यांचा समावेश असेल.
वज्र प्रहार हा सराव दोन्ही देशांना संयुक्त विशेष दलाच्या मोहीमांच्या संचालनासाठी आपल्या सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव सामायिक करण्यास सक्षम बनवेल. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता, सद्भाव आणि सौहार्द वाढवण्यास मदत होईल.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070154)
Visitor Counter : 152