रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवासानिमित्त होत असलेल्या गर्दीच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये वाढ - रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षाविषयक सूचना


दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांनिमित्त होत असलेल्या गर्दीमुळे दैनंदिन प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर पसरलेल्या भारतीय रेल्वे सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षित आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल वचनबद्ध

रेल्वे परिसरात काही धोकादायक आणि ज्वलनशील वस्तू आढळल्यास, त्याबाबत कळवण्याचे आरपीएफचे आवाहन

Posted On: 30 OCT 2024 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

रेल्वे परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, त्याबाबत प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिलेल्या मदत क्रमांकावर रेल्वे सुरक्षा दलाला (Railway Protection Force - RPF)  कळवावे असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. दिवाळीच्या सणाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसे देशभरात प्रकाश, आनंदाचे वातावरण आणि प्रवासाच्या प्रमाणाही वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि निर्विघ्न रेल्वे प्रवास करता यावा याची सुनिश्चिती  करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षाविषयक कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. 

रेल्वेच्या परिसरात  तुम्हाला कोणतेही संशयास्पद पदार्थ आढळल्यास, कृपया  हेल्पलाइन 139 आणि  Rail Madad पोर्टलचा वापर करून कळवण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे. 

सणासुदीच्या काळात सुरक्षित प्रवास व्हावा, यादृष्टीनेच आग लागण्यासारख्या घटनांचा धोका टाळता यावा यासाठी तसेच रेल्वे मार्गांवरील अपघात रोखण्यासाठी  रेल्वे सुरक्षा दलाने सर्वसमावेशक सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. यासाठी  रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे व्यवस्थापनाशी संबंधित विविध भागधारकांच्या सहकार्याने जनजागृती विषयक पत्रकांचे वाटप, जागोजागी जागृतीपर आणि लक्षवेधी पोस्टर्स लावणे, प्रबोधनपर पथनाट्ये (नुक्कड़ नाटके) सादर करणे आणि जागृतीपर सार्वजनिक घोषणांचे प्रसारण करणे अशा प्रकारच्या व्यापक उपाययोजना  राबवायला सुरुवात केली आहे. सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचता यावे यासाठी समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही वापर केला जात आहे. आग लागण्यासारख्या घटनांचा धोका टाळण्यासाठी पोर्टेबल स्टोव्हचा  वापर करणारे विक्रेते आणि फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्यासह, अतिरिक्त सामानाची आणि वाहतूक मालाची तपासणी करण्याची विशेष मोहीमही 15 ऑक्टोबर 2024 पासून राबवली जात आहे.

रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेत सुरू  केलेल्या या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत धोकादायक, ज्वलनशील वस्तू बाळगल्याप्रकरणी 56 जणांविरोधात रेल्वे कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, रेल्वेमध्ये धूम्रपान केल्याबद्दल 550 लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे तर 2,414 व्यक्तींवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या (COTPA) विविध तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“दिवाळी आणि छठ हे आनंद आणि एकतेची भावना वृद्धिंगत करणारे  सण आहेत आणि आमच्या प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे प्रतिपादन रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी केले. "आम्ही प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो," असेही ते म्हणाले.

अपघात आणि गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने, रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत:

  • कोणतेही फटाके, ज्वलनशील पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास, गाड्यांमध्ये किंवा स्थानकांवर असलेले रेल्वे सुरक्षा दल किंवा सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्मचारी किंवा रेल्वे प्राधिकरण यांना  त्वरित कळवा.
  • तुमच्या मौल्यवान वस्तू तुमच्याजवळ आणि नजरेसमोर ठेवा.
  • कमी सामानासह प्रवास करा आणि अतिरिक्त सुरक्षिततेसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडा.
  • मुले नेहमी प्रौढांसोबत असतील याची खात्री करा.
  • उद्घोषणांकडे लक्ष द्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

काटेकोरपणे अमलात आणले जाणारे सुरक्षा उपाय :

  • प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाढीव टेहळणी 
  • रेल्वेगाडीत आणि स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून वाढीव गस्त 
  • गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारी रेल्वे पोलिसांबरोबर (GRP) सहयोग.
  • सामान आणि प्रवाशांची नियमित तपासणी.
  • प्रवासादरम्यान सुरक्षेसंदर्भात प्रवासी रेल्वे मदत वेब पोर्टल (https://railmadad.indianrailways.gov.in) किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे किंवा 139 हेल्पलाइन क्रमांकावर  मदत मिळवू शकतात.

 

* * *

S.Kakade/Tushar/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2069753) Visitor Counter : 46