नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय एकता आणि अखंडता साजरी करण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने देशव्यापी ‘एकता दौड’चे आयोजन

Posted On: 29 OCT 2024 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2024

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या भावनेच्या सन्मानार्थ बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने देशभरात ‘एकता दौड ’कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवी दिल्लीसह देशातील प्रमुख बंदरे आणि संबंधित आस्थापनांमध्ये झालेल्या या कार्यक्रमात विविध वयोगटांतील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी इथे झालेल्या एकता दौड मध्ये सहभाग नोंदवला; तर राज्यमंत्री शंतनू ठाकूर कोलकाता इथे कार्यक्रमात सहभागी झाले. नवी दिल्ली मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांच्यासह उत्साहाने 1,000 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये खेलो इंडियातील क्रीडापटू, योगसराव करणारे उत्साही लोक, ज्येष्ठ नागरीक आणि स्केचर्सच्या धावपटूंचा समावेश होता. नामांकित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू आणि 1992 च्या आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपदाची विजेती सुनिता गोदरा हिने एकता दौडचे नेतृत्व केले आणि आपल्या चिकाटी आणि निश्चयी वृत्तीने सहभागींना प्रेरित केले.

आपल्या संदेशात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “एकता दौड ही निव्वळ दौड नसून हे सरदार पटेलांच्या एकसंध भारताची दृष्टी साकारण्याप्रती असलेल्या आपणा सर्वांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आपली ताकद ही आपल्या एकतेत आहे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण एकत्र येण्याच्या महत्त्वाचे या कार्यक्रमाने आपल्याला स्मरण करून दिले आहे.”

राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले, “आजच्या कार्यक्रमात आपल्या वारशासाठी सहभागी झालेल्या विविध वयाच्या, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नागरिकांनी भारतातील विविधता अधोरेखित केली आहे. भारतातील एकतेचे चैतन्य साजरा करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि हे चैतन्य आमच्यातील ताकदीला सागरी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरीसाठी पथदर्शी राहिले आहे.”

एकता दौड ही सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली आहे आणि देशभरात एकता आणि सामूहिक चैतन्याला प्रोत्साहन देण्याप्रती मंत्रालयाची वचनबद्धता बळकट करणारी आहे.

एकता दौडने विविध वयोगटांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नागरिकांना एकत्र आणले आहे. शारिरीक स्वास्थ्य, सामूहिक सहभाग आणि विशेषतः राष्ट्राच्या प्रगतीसाठी चिरस्थायी एकतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम असल्याचे, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन यांनी म्हटले आहे.

   

कार्यक्रमाची सांगता सर्व बंदरे आणि सहभागी समुदायांमध्ये राष्ट्रीय दृढ ऐक्याच्या दुमदुमलेल्या संदेशाने झाली. समृद्ध आणि एकसंध भारतासाठी योगदान देण्याकरता संवेदनक्षम, संलग्न सागरी समुदाय घडवण्यासाठी मंत्रालयाच्या प्रतिबद्धतेचे स्मरण करून देणारा हा कार्यक्रम  झाला.

 

 

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2069334) Visitor Counter : 13