सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
'ॲक्ट फॉर डिसलेक्सिया (Act4Dyslexia)' मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रपती भवनासह, देशातील इतर महत्त्वाच्या इमारती आणि स्मारके लाल रंगाने उजळल्या
Posted On:
28 OCT 2024 4:41PM by PIB Mumbai
देशव्यापी ‘ॲक्ट फॉर डिसलेक्सिया’ मोहिमेअंतर्गत डिस्लेक्सिया संदर्भात जागरूकता पसरविण्याच्या एका महत्त्वाच्या उपक्रमात, राष्ट्रपती भवन, संसद भवन, उत्तर आणि दक्षिण ब्लॉक आणि इंडिया गेट या सारखी सरकारची सर्वोच्च कार्यालये आणि दिल्लीतील प्रमुख स्मारके लाल रंगाने प्रकाशित करण्यात आली आहेत.
पाटणा, रांची, जयपूर, कोहिमा, शिमला आणि मुंबई यासारख्या इतर प्रमुख शहरांमध्येही लाल रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. या विकाराबाबत असणारी कलंक भावना काढून टाकण्याच्या तसेच डिस्लेक्सिया आणि इतर लर्निग डिसऑर्डर म्हणजेच शिकण्याच्या अक्षमतेबद्दल अधिक जागरूकता पसरवण्याच्या गरजेवर प्रकाश टाकण्यासाठी प्रतिकात्मक रूपात लाल रंगाची रोषणाई केली जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश शिकण्याच्या अक्षमतेबद्दल जागरुकता वाढवणे हा आहे. शिकण्याची अक्षमता या विकारामुळे सुमारे 3.5 कोटी विद्यार्थ्यांसह भारताच्या 20% लोकसंख्येवर परिणाम होईल असे अनुमान आहे. हा उपक्रम युनेस्को महात्मा गांधी शांती आणि शाश्वत विकास शिक्षण संस्था आणि चेंज इंक फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.
समावेशकतेचा संदेश पसरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉक फॉर डिसलेक्सिया (Walk4Dyslexia)’ ला दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी संयुक्त राष्ट्राचे भारतातील निवासी समन्वयक शॉम्बी शार्प, यांच्यासमवेत हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हा उपक्रम डिस्लेक्सिया असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी सामूहिक कृतीचे प्रतीक असून शिकण्याची अक्षमता असलेल्या व्यक्तींना समान संधी आणि पाठींबा देण्याच्या गरजेवर भर देतो.
‘ॲक्ट फॉर डिसलेक्सिया’ ही एक विचारपूर्वक योजण्यात आलेली मोहीम आहे, कारण आपल्याला प्रगती साधण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे, असे या मोहिमेबद्दल उत्साह व्यक्त करत राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
या प्रसंगी आपला दृष्टीकोन मांडताना शॉम्बी शार्प म्हणाले, “हे अविश्वसनीय आहे की जेव्हा समान संधी दिली जाते तेव्हा लर्निग डिसॅबिलिटी असणाऱ्या व्यक्ती संशोधक, नोबेल पारितोषिक विजेते आणि उद्योजक बनतात आणि अतुलनीय यश देखील संपादीत करतात”. सामाजिक विकासासाठी या प्रतिभावंतांची क्षमता खऱ्या अर्थाने प्रदर्शित करण्याची गरज आहे आणि जर भारत हे साध्य करू शकला तर तो जागतिक स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टेही साध्य करू शकेल." असेही ते म्हणाले.
डिस्लेक्सिया जागृतीसाठीच्या देशव्यापी चळवळीचा या वर्षी लक्षणीय विस्तार झाला आहे. या अंतर्गत देशभरात राज्यांच्या राजधान्या, जिल्हे, ब्लॉक, गावे आणि शाळांमध्ये सुमारे 1,600 हून अधिक पदयात्रा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमात 4 लाखांहून अधिक जण सहभागी झाले असून या सर्वांनी ‘ॲक्ट फॉर डिसलेक्सिया’ अंतर्गत जागृतीसाठी एकत्रितपणे 2 अब्ज पावले उचलली आहेत.
डिस्लेक्सियाबाबत जागरूकता का महत्त्वाची आहे
डिस्लेक्सियाला अनेकदा 'स्लो-लर्नर सिंड्रोम' समजले जाते. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे शिकण्याची अक्षमता असलेल्या व्यक्तींना गोष्टी समजून घेणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, शब्दलेखन करणे किंवा गणिती आकडेमोड करणे कठीण असले तरी ते तर्कशुद्ध गहन विचार, समस्या सोडवणे आणि नवोन्मेष यासारख्या उच्च-श्रेणीच्या विचारांसाठी आवश्यक कौशल्ये त्यांच्या ठायी असतात. उल्लेखनीय म्हणजे, 40% लक्षाधीशांना डिस्लेक्सिया आहे आणि अल्बर्ट आइनस्टाईन सारखे अनेक प्रसिद्ध संशोधक डिस्लेक्सिक होते.
डिस्लेक्सियासह विशिष्ट लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या व्यक्तींना अधिकृतपणे दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा 2016 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. हा कायदा या व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि जीवनाच्या इतर पैलूंमध्ये समान संधी अनिवार्य करतो.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068998)
Visitor Counter : 75