लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक धोरणामध्ये प्रत्येकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

Posted On: 27 OCT 2024 10:00PM by PIB Mumbai

 

आपल्या समाजाच्या वैविध्यपूर्ण गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक धोरणामध्ये प्रत्येकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. जेव्हा धोरणात सर्वांच्या आशाआकांक्षांचे आणि अनुभवांचे प्रतिबिंब उमटते तेव्हा आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळते, असे ते म्हणाले. बिर्ला यांच्या हस्ते आज भुवनेश्वर येथे  केआयआयटी अर्थात कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये केआयआयटी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी या संस्थेचे उदघाटन करताना ते बोलत होते. 

समाजाच्या सामूहिक शक्तीचा उपयोग करून घेऊन आपण सर्वसमावेशक उपाय शोधू शकतो. यामुळे सामाजिक बंध बळकट होण्यासोबतच प्रत्यक्ष जगातील आव्हानांवर प्रभावीपणे तोडगा निघू शकेल, कोणीही वंचित न राहण्याची सुनिश्चिती होऊ शकेल, असे बिर्ला यांनी सांगितले.

कार्यक्रमाला संबोधित करताना बिर्ला यांनी भारतीय लोकशाही मूल्यांची लवचिकता अधोरेखित करताना लोक हेच शेवटी त्यांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे खरेखुरे संरक्षक असतात, असे सांगितले. भारतीय लोकशाही बळकट करणाऱ्या विविधता तत्त्वाचे महत्त्वदेखील त्यांनी अधोरेखित केले. भारताचा समृद्ध सांस्कृतिक, भाषिक आणि परंपरांचा कोलाज भारतीय लोकशाही सचेत राहण्यासाठी योगदान देतो, असे त्यांनी सांगितले.

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे, या विचाराचे महत्त्व त्यांनी सांगितले. संस्कृती आणि राष्ट्राच्या सीमा ओलांडून वैश्विक शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी या विचाराचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एकता आणि सहकार्याचे तत्त्व अंगीकारून राष्ट्रे सामूहिकरित्या जागतिक आव्हानांवर मार्ग काढू शकतात आणि चिरस्थायी सलोखा स्थापित करू शकतात आणि अखिल मानवजातीसाठी समृद्धी आणू शकतात, असे बिर्ला यांनी सांगितले.

तत्पूर्वी, बिर्ला यांनी भुवनेश्वरमधील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (KISS) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे यावर  बिर्ला यांनी भर दिला. शिक्षित समाज नवोन्मेष, आर्थिक वाढ आणि सामाजिक सलोख्याला चालना देत नागरिकांना विचारपूर्वक निर्णय  घेण्यास सक्षम करतो, जे संपूर्ण राष्ट्रासाठी लाभदायक ठरतात, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी यावेळी केले.

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2068942) Visitor Counter : 63