संरक्षण मंत्रालय
एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिर-2025 चा एक भाग म्हणून 500हून अधिक कॅडेट्स सुरू करणार गंगा आणि हुगळी नद्यांमधून 1200 किमीचा जलप्रवास
Posted On:
20 OCT 2024 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या उपक्रमांतर्गत नॅशनल कॅडेट कोअर(NCC) प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 चा एक प्रमुख कार्यक्रम म्हणून आपल्या पहिल्या नौकानयन मोहिमेवर रवाना होणार आहे. या मोहिमेत एनसीसीच्या नौदल शाखेचे भारतभरातील 528 छात्र सहभागी होतील आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून वाहणाऱ्या गंगा आणि हुगळी नदीतून सुमारे 1200 किमी नौकानयन करतील. ‘भारतीय नद्या-संस्कृतींची जननी’ ही संकल्पना असलेल्या हा उपक्रम 21 ऑक्टोबर 2024 रोजी कानपूरहून सुरू होईल आणि 20 डिसेंबर, 2024 रोजी कोलकात्याला त्याची सांगता होईल.
भारताच्या समृद्ध सागरी परंपरांचा सन्मान करताना युवा वर्गाला साहस आणि गणवेश परिधान करून केल्या जाणाऱ्या देशसेवेची प्रेरणा देणे हा या अग्रणी मोहिमेचा उद्देश आहे. सहा टप्प्यात होणाऱ्या या उपक्रमात सर्व राज्य महासंचालनालयांचे प्रतिनिधित्व करणारे छात्र सहभागी होतील. त्यांच्यासोबत 40 सहाय्यक एनसीसी अधिकारी असतील.
या प्रवासादरम्यान छात्र स्थानिक एनसीसी समूहांसोबत संपर्क साधतील आणि नदीच्या काठांवर स्वच्छता मोहीम राबवून आणि प्लास्टिक कचरा कमी करून स्वच्छ भारत उपक्रमात योगदान देतील. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ते पथनाट्ये देखील सादर करतील.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066523)
Visitor Counter : 47