संरक्षण मंत्रालय
बारकाईने विचार करा, अज्ञात परिस्थितीसोबत जुळवून घ्या आणि सध्याच्या काळात धोरणात्मक वरचष्मा मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराः संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील लष्करी नेत्यांना आवाहन
Posted On:
19 OCT 2024 2:31PM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी नेत्यांना बारकाईने विचार करण्याचे, अज्ञात परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचे आणि सध्याच्या काळात सातत्याने बदलत राहणाऱ्या भूराजकीय परिदृश्यात धोरणात्मक वरचष्मा मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ते आज (19 ऑक्टोबर 2024) नवी दिल्लीत 62व्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अभ्यासक्रमाच्या (2022ची तुकडी) पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी या अधिकाऱ्यांना जागतिक राजकीय परिस्थिती विचारात घेऊन, भावी काळातील संघर्षांचे पूर्वानुमान लावण्याची क्षमता असलेले, लष्करी डावपेचांची आखणी करणारे आणि बुद्धिमत्ता आणि दयाबुद्धी या दोन्ही भावनांनी नेतृत्व करणारे बनण्याचे आवाहन केले.
“सध्याच्या काळातील युद्धतंत्रामध्ये पारंपरिक रणमैदाने मागे पडली आहेत आणि आताच्या काळात जिथे सायबर, अवकाश आणि माहितीचे युद्धतंत्र पारंपरिक मोहिमांइतकेच महत्त्वाचे आहे, अशा परिस्थितीत बहु-माध्यम वातावरणात युद्धे लढवली जात आहेत. सायबर हल्ले, जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार आणि आर्थिक युद्धतंत्रे ही सध्याच्या काळातील आयुधे बनली आहेत, ज्यामुळे एकही गोळी न झाडता एखाद्या देशाला खिळखिळे करता येऊ शकते. त्यामुळे लष्करी नेत्यांनी गुंतागुंतीच्या समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि त्यावर नवोन्मेषी उत्तरे शोधण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, अशी अपेक्षा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या काळात झपाट्याने तंत्रज्ञानात होणारी प्रगती हेच भविष्यासाठीच्या लष्करी सज्जतेला चालना देणारे महत्त्वाचे बळ असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
“ड्रोन्स आणि स्वायत्त वाहनांपासून कृत्रिम प्रज्ञा आणि क्वांटम कंप्युटिंगपर्यंत विविध प्रकारचे तंत्रज्ञान आधुनिक युद्धतंत्रामध्ये अविश्वसनीय वेगाने विकसित होत आहे. आपल्या अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान वेळीच आत्मसात केले पाहिजे आणि त्याचा उपयोग केला पाहिजे,” असे ते म्हणाले. कोणत्या यंत्रांनी जीवन आणि मृत्यूचे निर्णय किती प्रमाणात घ्यावेत याविषयी लष्करी नेत्यांना भेडसावणाऱ्या नैतिक दुविधेच्या पैलूवर संरक्षणमंत्री म्हणाले की नैतिकता, तत्त्वज्ञान आणि लष्करी इतिहासातील शैक्षणिक शिक्षण अधिकाऱ्यांना संवेदनशील विषय हाताळण्यासाठी साधने प्रदान करेल. सध्याच्या युद्धातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भविष्यातील नेत्यांमध्ये नैतिक चौकट निर्माण करण्यासाठी एनडीसी सारख्या संरक्षण शैक्षणिक संस्थांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेला त्यांनी अधोरेखित केले.
उदयोन्मुख धोक्यांना प्रत्युत्तर देण्याची आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याची क्षमता असलेले तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अतिशय चपळाईने कारवाई करण्याची क्षमता असलेले सैन्यदल विकसित करण्याचा सरकारचा निर्धार राजनाथ सिंह यांनी बोलून दाखवला. सशस्त्र दले भविष्यासाठी सज्ज आणि प्रतिरोधक असावीत यासाठी प्रयत्न केले जात असताना, एनडीसी सारख्या संरक्षण संस्था लष्करी नेत्यांच्या दृष्टीकोनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यांना सध्याच्या काळातील गुंतागुंतीची परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्याने सुसज्ज करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले.
राजनाथ सिंह यांनी 62 व्या एनडीसी अभ्यासक्रमाच्या एमफील पदवी प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, विशेषतः मित्र देशांच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. हे अधिकारी भारत आणि संबंधित देशांमधील सेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात जी आव्हाने आणि समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्यामुळे या भागाची एकत्रित सुरक्षा आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2066335)
Visitor Counter : 59