माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत आणि कोलंबिया यांनी चित्रपट सह-निर्मिती आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी दृक-श्राव्य सह-निर्मिती करारावर केली स्वाक्षरी
Posted On:
15 OCT 2024 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
भारत आणि कोलंबिया यांनी ऑडिओ-व्हिज्युअल अर्थात दृक-श्राव्य सह-निर्मिती करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे भारतीय आणि कोलंबियन चित्रपट निर्माते चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंवर सहकार्यासाठी मंच वापरास सक्षम होतील. या करारामुळे दोन्ही देशांच्या चित्रपट उद्योगातील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील संबंध अधिक दृढ होऊन सहकार्याचा नवा अध्याय उलगडेल अशी अपेक्षा आहे. या करारावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज एनरिक रोजास रॉड्रिग्ज यांनी स्वाक्षरी केली.
कोलंबिया - भारतासोबत दृक-श्राव्य सह-उत्पादन करारावर स्वाक्षरी करणारा 17 वा देश
भारत आणि कोलंबिया यांच्यातील करारामुळे दोन्ही देशांतील निर्मात्यांना त्यांच्या सर्जनशील, कलात्मक, तांत्रिक, आर्थिक आणि विपणन संसाधनांचा सह-उत्पादनासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे कला आणि संस्कृतीची देवाणघेवाण होईल आणि दोन्ही देशांतील लोकांमध्ये सद्भावना निर्माण होईल आणि सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल.
या करारामुळे भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ तयार करण्याची आणि त्याचे प्रदर्शन करण्याची आणि पोस्ट-प्रॉडक्शन आणि मार्केटिंगसह चित्रपट निर्मितीमध्ये गुंतलेल्या कलात्मक, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक मानव संसाधनांमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल.
विविध देशांसोबत दृकश्राव्य सह-उत्पादन करार
यापूर्वी, भारत सरकारने 2005 मध्ये इटली, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दर्न आयर्लंड सरकार, 2007 मध्ये जर्मनी आणि ब्राझील, 2010 मध्ये फ्रान्स, 2011 मध्ये न्यूझीलंड, 2012 मध्ये पोलंड आणि स्पेन सरकार सोबत अशाचप्रकारचे करार केले होते. नजीकच्या काळात म्हणजे 2014 मध्ये कॅनडा आणि चीन, 2015 मध्ये कोरिया, 2016 मध्ये बांगलादेश, 2017 मध्ये पोर्तुगाल, 2018 मध्ये इस्रायल, 2019 मध्ये रशिया आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया सरकार सोबत करार केले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065172)
Visitor Counter : 72