संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या मलबार 2024 आंतरराष्ट्रीय कवायतींचा सागरी टप्पा विशाखापट्टणम येथे सुरु
Posted On:
15 OCT 2024 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
मलबार 2024 कवायतींचा सागरी टप्पा विशाखापट्टणम किनारपट्टीजवळच्या समुद्रात 14 ऑक्टोबर 24 रोजी सुरू झाला. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकी (यूएसए) नौदलाच्या युद्धनौका, युद्धनौकांवरील हेलिकॉप्टर आणि लांब पल्ल्याची सागरी गस्ती विमाने आता बंगालच्या उपसागरात एकत्रितपणे सराव करत असून, यामधून त्यांच्यातील उच्च स्तरावरील सहयोग आणि परिचालनातील समन्वय प्रदर्शित होत आहे.
या टप्प्याचा एक भाग म्हणून, सहभागी देशांचे नौदल सागरी पृष्ठभाग, पृष्ठभागाखाली आणि हवाई युद्ध क्षेत्रात सागरी युद्ध तंत्राच्या विस्तृत श्रेणीचा सराव करतील. परस्पर सामंजस्य आणि समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने या प्रगत आणि गुंतागुंतीच्या सरावांची आखणी करण्यात आली असून, खोल समुद्रात संयुक्त कृती दल म्हणून अखंड काम करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. सागरी पृष्ठभागाखालील युद्ध सरावांमध्ये, भारतीय नौदलाच्या पाणबुड्या सहभागी होणार असून, या टप्प्यात सहभागी देशांच्या विशेष दलांच्या संयुक्त कवायती देखील आयोजित केल्या जातील.
कवायतींचा हा सागरी टप्पा, सहभागी देशांची एकमेकांबरोबर काम करण्याची क्षमता अधिक मजबूत करेल आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्यात योगदान देईल. 18 ऑक्टोबर 24 रोजी मलबार 2024 च्या समारोप समारंभाने या कवायतींचा सागरी टप्पा पूर्ण होईल.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065153)
Visitor Counter : 49