ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'ग्रीनवॉशिंग आणि दिशाभूल करणाऱ्या पर्यावरणीय दाव्यांना प्रतिबंध आणि नियमन' यासंदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना


दिशाभूल करणारे पर्यावरणीय दावे आणि ग्रीनवॉशिंग यापासून कंपन्यांना परावृत्त करणाऱ्या मार्गदर्शक सूचना

Posted On: 15 OCT 2024 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2024

 

सार्वजनिक आणि ग्राहक हितासाठी धोकादायक, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, यासंदर्भातील नियमनाच्या अधिकाराचा वापर करताना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ग्रीन वॉशिंगच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि दिशाभूल करणाऱ्या पर्यावरणीय दाव्यांच्या प्रतिबंध आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी ही माहिती दिली. 

पर्यावरणीय दावे खरे आणि अर्थपूर्ण असतील अशा प्रामाणिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यामुळे ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत होईल आणि शाश्वत पद्धतींना चालना मिळेल. 

प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त असलेल्या खरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रीनवॉशिंगसंदर्भात (उत्पादनाच्या पर्यावरणीय लाभाबद्दल खोटी, दिशाभूल करणारी माहिती) एक समिती नेमण्यात आली होती. पुरेसा विचारविनिमय केल्यानंतर समितीने आपल्या शिफारशी सादर केल्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे विभागाने सार्वजनिक टिप्पण्यांसाठी मार्गदर्शक सूचनांचा मसुदा 20 फेब्रुवारी 2024 रोजी आणला. 27 विविध भागधारकांकडून सार्वजनिक सूचना प्राप्त झाल्या. उल्लेखनीय सूचनांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • विशिष्ट पर्यावरणीय दावे विश्वासार्ह प्रमाणीकरण, विश्वासार्ह शास्त्रीय पुरावे, यांचा आधार असावा.
  • शाश्वत, नैसर्गिक, सेंद्रीय, पुनर्निर्मिती करणारे असे शब्द आणि तत्सम प्रतिपादने पुरेशा, योग्य आणि उपलब्धता पुराव्यांशिवाय वापरले जाऊ नयेत. 
  • 'नैसर्गिक', 'सेंद्रीय', शुद्ध यासारखे पर्यावरणीय डाव्यांसाठी पुरेसे प्रकटीकरण आवश्यक आहे. 

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सूचनांचा विचार केल्यानंतर ग्रीनवॉशिंग आणि दिशाभूल करणाऱ्या पर्यावरणीय दाव्यांना प्रतिबंध घालण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी "ग्रीनवॉशिंग किंवा दिशाभूल करणारे पर्यावरणीय दावे यांना प्रतिबंध आणि नियमन  2024" या शीर्षकाची मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत.

हरित (पर्यावरणाला अनुकूल) उत्पादने आणि पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. 'ग्रीन वॉशिंग' हा शब्द 'व्हाईट वॉशिंग' च्या आधारे तयार करण्यात आला आहे. विक्रीच्या डावपेचांचा संदर्भ यामागे आहे. 'नैसर्गिक', 'पर्यावरणपूरक' किंवा हरित यासारखे शब्द वापरून कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या पर्यावरणीय फायद्यांचा खोटा दावा करतात किंवा अतिशयोक्ती करतात. पर्यावरणीय जबाबदारीचा आभास  निर्माण करून, अनेक बेईमान कंपन्या ग्राहकांच्या वाढत्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे शोषण करतात. चांगला हेतू असलेल्या ग्राहकांचे ही फसवी पद्धत दिशाभूल तर करतेच शिवाय व्यापक पर्यावरणीय प्रयत्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवते. ही मार्गदर्शक तत्त्वे पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्पादक आणि सेवा प्रदात्यांचे सक्रीय प्रयत्न आणि पर्यावरणीय वस्तू आणि सेवांमध्ये ग्राहकांचा वाढता रस यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले प्रगतिशील नियमन आहे.  

(ही मार्गदर्शक तत्त्वे ग्राहक विभागाच्या संकेतस्थळावर Greenwashing_Guidelines.pdf (consumeraffairs.nic.in) उपलब्ध आहेत. 

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2065150) Visitor Counter : 62