गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे जागतिक अधिवास दिन 2024 केला साजरा
Posted On:
09 OCT 2024 8:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2024
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 9 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे जागतिक अधिवास दिन 2024 साजरा केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
“वेगवान विकास साधण्यासाठी आणि शहरांसाठी अधिक उज्वल आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी देशातील युवक महत्त्वाचा घटक आहेत”, असे तोखन साहू यांनी जागतिक अधिवास दिन 2024 समारंभात आपल्या भाषणात सांगितले.
'उत्तम शहरी भविष्य निर्माण करण्यासाठी युवकांना सहभागी करून घेणे 'या जागतिक अधिवास दिनाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केले की भारतातील युवकांची लोकसंख्या इतर राष्ट्रांच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक असून सरासरी वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे, कोणत्याही योजना/धोरणाच्या यशासाठी आणि 2047 पर्यंत सरकारचे विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक ठरतो.
या वर्षीच्या जागतिक अधिवास दिनाची संकल्पना ‘उत्तम शहरी भविष्य निर्माण करण्यासाठी युवकांना सहभागी करून घेणे ’ आहे ज्याचा उद्देश सहभागात्मक प्रक्रियांमध्ये युवकांचा सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाच्या संधींद्वारे वेगवान शहरीकरणाची आव्हाने आणि संधीना सामोरे जाणे हा आहे. अधिक समावेशक, लवचिक आणि शाश्वत शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी शहर नियोजन आणि निर्णय प्रक्रियांमध्ये तरुणांच्या सक्रिय सहभागाचे समर्थन करण्यावर भर देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये युवा शिक्षण, कौशल्य विकास, नवोन्मेष आणि सर्वांगीण प्रगतीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. येत्या 5 वर्षांत 1 कोटी युवकांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाईल. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये 4.1 कोटी तरुणांना रोजगार आणि कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063657)
Visitor Counter : 49