ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाला अनुरूप, पोषणमूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम सुरू ठेवणे केंद्र सरकारच्या ॲनिमिया मुक्त भारत धोरणांतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांना पूरक ठरेल

पंतप्रधानांच्या कल्पनेतील पोषण सुरक्षेच्या दिशेने मोठे पाऊल

Posted On: 09 OCT 2024 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत  पोषणमूल्ययुक्त   तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते  डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी  दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (अन्न अनुदान) चा भाग म्हणून पोषणमूल्ययुक्त तांदळाचा उपक्रम केंद्र सरकारच्या 100% अर्थसहाय्यासह केंद्रीय क्षेत्रातील उपक्रम म्हणून सुरू राहील आणि यामुळे अंमलबजावणीसाठी एक एकीकृत संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध होईल.

त्यानुसार, देशातील पोषण सुरक्षेच्या आवश्यकतेबाबत 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने,  देशातील ॲनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांची  कमतरता दूर करण्यासाठी "सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली, इतर कल्याणकारी योजना, एकात्मिक बाल विकास सेवा, पीएम पोषण  (पूर्वीचे माध्यान्ह भोजन)च्या माध्यमातून पोषणमूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा" उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

एप्रिल 2022 मध्ये आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने  मार्च 2024 पर्यंत देशभरात टप्प्याटप्प्याने पोषणतत्वयुक्त तांदळाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता.  सर्व तीन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत आणि सरकारच्या सर्व योजनांमध्ये पोषणमूल्ययुक्त तांदळाचा पुरवठा करण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीचे लक्ष्य  मार्च 2024 पर्यंत साध्य झाले आहे.

2019 ते  2021 दरम्यान आयोजित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, ॲनिमिया ही भारतातील एक व्यापक समस्या आहे, ज्याचा परिणाम विविध वयोगटातील तसेच उत्पन्नाच्या स्तरांमधील मुले, महिला  आणि पुरुष यांच्यावर होतो. लोहाच्या कमतरतेव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारख्या इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील असते आणि त्याचा लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि उत्पादकतेवर परिणाम होतो.

असुरक्षित लोकसंख्येतील ऍनिमिया आणि सूक्ष्म पोषक घटकांचे  कुपोषण दूर करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणून जागतिक स्तरावर पोषणमूल्ये-युक्त अन्नाचा  वापर केला जातो. भारताच्या बाबतीत तांदूळ हे  सूक्ष्म पोषणद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एक योग्य धान्य आहे कारण भारतातील 65% लोकसंख्येचे  तांदूळ हे मुख्य अन्न आहे. पोषणमूल्ययुक्त

तांदळामध्ये  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण द्वारे निर्धारित मानकांनुसार नियमित तांदळामध्ये  (कस्टम मिल्ड राइस) सूक्ष्म पोषक घटकांनी (लोह,  फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 12) समृद्ध असलेल्या  फोर्टिफाइड राइस कर्नलचा समावेश केला जातो.  

 

* * *

JPS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063541) Visitor Counter : 85