आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युएनएफपीए अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीने माता आरोग्य आणि कुटुंब नियोजन क्षेत्रात भारताच्या आघाडीचा केला सन्मान


वर्ष 2000 पासून 2020 पर्यंत माता मृत्यू दर (एमएमआर) प्रभावीपणे 70%नी कमी करण्यासाठी भारताने केलेल्या महत्वाच्या प्रयत्नांची केली प्रशंसा

Posted On: 09 OCT 2024 8:56AM by PIB Mumbai

भारताने माता आरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात केलेल्या असामान्य प्रगतीची संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने (युएनएफपीए)नोंद घेतली आहे. युएनएफपीएच्या  कार्यकारी संचालक डॉ.नतालिया कानेम यांनी केंद्रीय आरोग्य सचिव सलीला श्रीवास्तव यांना मानपत्र तसेच पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आणि महिलांचे आरोग्य आणि स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी भारतासह भागीदारी करण्याची युएनएफपीएची अतूट कटिबद्धता अधोरेखित केली.

टाळता येण्याजोग्या माता मृत्यूंबाबत प्रयत्न करून हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी माता आरोग्याबाबत सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अनेक कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना (सुमन), पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) आणि  सुतिकागृह सेवाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि सन्माननीय स्वरूपाच्या खात्रीशीर मातृत्वविषयक सेवेचा समावेश आहे.

अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक आराधना पटनाईक; प्रजनन आणि बाल आरोग्य (आरसीएच)विभागाच्या संयुक्त सचिव मीरा श्रीवास्तव;युएनएफपीएचे हिंद प्रशांत क्षेत्रासाठीचे संचालक पिओ स्मिथ आणि युएनएफपीएच्या भारतासाठीच्या प्रतिनिधी आंद्रिया एम.वोजनर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात डॉ.कानेम यांनी वर्ष 2000 पासून 2020 पर्यंत माता मृत्यू दर (एमएमआर) प्रभावीपणे 70%नी कमी करण्यासाठी भारताने केलेल्या महत्वाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या कामगिरीमुळे, वर्ष 2030 पूर्वी देशातील एमएमआर 70 च्या खाली राखण्याचे शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) गाठण्यात देशाला यश आले आहे.

भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाने देखील नवी उंची गाठली असून, एकंदर प्रजननक्षमता दर प्रतिस्थापन पातळी (टीएफआर-2)पेक्षा कमी झाला आहे.गेल्या काही वर्षांत युएनएफपीएने सबडर्मल इम्प्लांट्स तसेच इंजेक्टेबल डीपोट मेड्रॉक्सिप्रोजेस्टेरॉन अॅसिटेट (डीएमपीए) यांच्या नुकत्याच केलेल्या समावेशासह गर्भनिरोधक पर्यायांच्या श्रेणीचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

माता, नवजात आणि बाल आरोग्य (पीएमएनसीएच)तसेच कुटुंब नियोजन 2030(एफपी2030) विषयक जागतिक भागीदारी मंचामध्ये भारताला भागीदारीसाठी दिलेल्या महत्त्वाच्या स्थानातून जागतिक पातळीवरील प्रजनन आरोग्य मंचावरील मंत्रालयाच्या आघाडीची दखल घेतली गेली आहे.

सदर बैठकीदरम्यान डॉ. कानेम यांनी महिला, मुली आणि किशोरावस्थेतील जनतेचे आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याप्रती युएनएफपीएच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

युएनएफपीएच्या भारतासोबतच्या भागीदारीची 50 वर्षे साजरी करण्यानिमित्ताने, ‘विकसित भारता’च्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने प्रगती करत असताना हा कार्यक्रम म्हणजे भारतातील प्रत्येक महिला आणि युवा वर्गातील व्यक्तींच्या आरोग्य आणि स्वास्थ्याची सुनिश्चिती करण्याच्या सामायिक मोहिमेतील महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2063433) Visitor Counter : 11